नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांना तापामुळे सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयाच्या बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधी यांना तापामुळे 2 मार्च रोजी 'चेस्ट मेडिसिन' विभागाचे प्रमुख डॉ अरुप बसू आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर सोनिया गांधी यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे: हॉस्पिटलने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, 'सोनिया गांधी डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची तपासणी केली जात आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. सर गंगाराम हॉस्पिटलच्या ट्रस्ट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. डी.एस. राणा यांच्या म्हणण्यानुसार, 'सोनिया गांधी यांना 2 मार्च रोजी सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अरुप बसू, वरिष्ठ सल्लागार, चेस्ट मेडिसिन विभाग आणि त्यांच्या टीमच्या अंतर्गत दाखल करण्यात आले. त्यांना ताप आलेला आहे. त्यांच्यावर देखरेख आणि तपासणी केली जात असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.
यावर्षात दुसऱ्यांदा रुग्णालयात: विशेष म्हणजे या वर्षात त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची ही दुसरी वेळ आहे. जानेवारीमध्ये, 76 वर्षीय माजी काँग्रेस प्रमुख असलेल्या सोनिया गांधी यांना व्हायरल श्वसन संक्रमणाच्या उपचारांसाठी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले होते. रायपूर येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या ८५व्या पूर्ण अधिवेशनात सोनिया गांधी यांना शेवटचे पाहण्यात आले होते. याआधी गेल्यावर्षी २४ डिसेंबर रोजी दिल्लीतील भारत जोडो यात्रेत ती सहभागी झाल्या होत्या. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नाही, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजकारणातून निवृत्ती घेणार नाहीत: नुकतेच काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा म्हणाल्या की, सोनिया गांधी निवृत्त झाल्या नसून, त्या पक्षाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहतील. भारत जोडो यात्रेने माझा डाव संपला, असे सोनिया गांधी यांनी अधिवेशनात सांगितले होते. मात्र त्या राजकारणातून निवृत्त झालेल्या नसल्याचेही लांबा यांनी सांगितले.