अररिया (बिहार) : 18 मे रोजी बिहारमधील छपरा येथे मिड-डे मीलमध्ये सरडा सापडल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता अररियामधून आणखी एक मोठे प्रकरण समोर आले आहे. येथील एका शाळेत माध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर 100 हून अधिक मुलांची प्रकृती बिघडली आहे. शनिवार असल्याने शाळेतील माध्यान्ह भोजनात मुलांना खिचडी देण्यात आली होती. मात्र ताटात सापाचे पिल्लू दिसल्याने शाळेत एकच गोंधळ उडाला. त्यापूर्वी काही मुलांनी खिचडी खाल्ली होती. आता अधिकृतपणे 25 मुले आजारी असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
उच्चस्तरीय चौकशी होणार : माध्यान्ह भोजन घेतलेल्या मुलांना उलट्या होऊ लागल्या होत्या. याबाबतची माहिती जोगबनी पोलीस ठाण्याला मिळताच ते पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्याचबरोबर फोर्ब्सगंज एसडीओ आणि एसडीपीओ यांनाही माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम आजारी मुलांना फोर्ब्सगंजच्या उपविभागीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने शाळेजवळ पोहोचले. काहींनी शाळेच्या मुख्याध्यापकालाही मारहाण केली. येथे मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एसडीओ सुरेंद्र अलबेला पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच या घटनेत जो कोणी जबाबदार असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले आहेत.
मध्यान्ह भोजनात सापाचे पिल्लू कसे आले, हा आश्चर्याचा विषय आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. घटना काय आहे, याचा उलगडा होण्यासाठी संबंधीतांची कसून चौकशी केली जाईल. सुमारे शंभर मुले आजारी पडल्याची अफवा पसरली होती, पण या क्षणी केवळ 25 मुलांची प्रकृती खालावली आहे. या सर्वांवर फोर्ब्सगंज रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली आहे. - सुरेंद्र अलबेला, एसडीओ
100 हून अधिक मुले आजारी : माहितीनुसार, हे अन्न शाळेत तयार केले गेले नव्हते तर पुरवठादाराने दिले होते. मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांची स्थिती जाणून घेण्यासाठी शाळेत घुसण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आणखी गोंधळ वाढला. काही पालकांना मुले रुग्णालयात असल्याची माहिती मिळताच सर्वांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र तरीही शाळेबाहेर पालक आणि ग्रामस्थांचा गोंधळ सुरूच होता. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे.
सर्व मुले धोक्याबाहेर : घटनास्थळी उपस्थित अमोना पंचायतीचे माजी प्रमुख मुन्ना खान यांनी सांगितले की, यात शाळेचा कोणताही दोष नाही. कंत्राटदाराकडून अन्न पुरवठा केला जातो. त्यातूनच एक साप बाहेर आला आहे. मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मुले निरोगी असून धोक्याबाहेर आहेत.
मिड डे मील अंतर्गत मुलांना जेवण देण्यात आले. या अन्नात साप आढळून आला. त्यावरून ग्रामस्थांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शाळेत अन्न शिजवले जात नाही. बाहेरून अन्न येते. प्रशासकीय विभागाच्या दुर्लक्षाला लगाम घालण्याची गरज आहे. - मुन्ना खान, माजी प्रमुख, अमौना पंचायत
हेही वाचा :