जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) : Sikkim Flash Floods Update : उत्तर सिक्कीममधील ल्होनाक तलावावर बुधवारी सकाळी ढगफुटीमुळं अनेक जण बेपत्ता झाले होते. त्यातील काही मृतदेह गुरुवारी पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमधील तिस्ता नदीतून मिळाले आहेत. यावेळी तब्बल 17 मृतदेह तिस्ता नदीतून बाहेर काढण्यात आले आहत.
23 जवानांसह 102 लोक बेपत्ता : भारतीय सैन्य, एनडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मोठ्या शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. यापूर्वी, 14 मृतदेह सापडले होते, तर 22 सैन्यातील जवानांसह 102 लोक बेपत्ता झाले होते. उत्तर सिक्कीममधील ल्होनाक तलावावर ढगफुटीमुळं तीस्ता नदीच्या पात्रात अचानक पूर आला होता. त्यामुळं यात मोठी जीवितहानी झाली आहे.
22 जवान अजूनही बेपत्ता : संरक्षण मंत्रालय गुवाहाटीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (संरक्षण) लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितलं की, सिक्कीममधील आपत्तीनंतर 23 सैनिक बेपत्ता आहेत. "त्यांपैकी एकाला काल जिवंत वाचवण्यात यश आलं आहे. त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. आणखी 22 जवान अजूनही बेपत्ता आहेत. शोध मोहीम सुरू असून जवानाचा शोध सुरू आहे.
कुठे किती मृतदेह सापडले? : विविध पोलीस स्थानकाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मैनागुरी पोलीस स्टेशन परिसरात 8, जलपाईगुडी सदर ब्लॉकमध्ये दोन, मेखलीगंजमध्ये दोन, क्रांती ब्लॉकमध्ये दोन, मलबाजार ब्लॉकमध्ये दोन आणि तकीमारी भागात तीन मृतदेह सापडले आहेत. मैनागुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी तमल दास म्हणाले, "मैनागुरी परिसरातून आठ मृतदेह सापडले आहेत. त्यात एक बालक, एक महिला आणि 6 पुरुष आहेत." मलबाजार पोलीस ठाण्याचे प्रभारी सुजित लामा यांनी सांगितलं की, परिसरात एक पुरुष आणि एक महिला असे दोन मृतदेह सापडले आहेत.
हेही वाचा -