मुंबई- शिवसेना आता मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे दिसत आहे. शिवनसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फुटीर आमदारांना कालच गर्भित इशारा दिला होता. त्यानंतर विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केल्याचे दिसत आहे. पुण्यात शिवसैनिकांनी राडा केला आहे. याचे लोण आता राज्यभर पसरण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांचा इशारा - संजय राऊत म्हणाले होते की, आम्ही हार मानणार नाही. फ्लोअर टेस्ट आम्हीच जिंकणार. ज्यांना सामना करायचा आहे त्यांनी मुंबईत यावे. बंडखोरांनी चुकीचे काम केले. आमची पूर्ण तयारी आहे, तुम्ही या, असे ते म्हणाले होते. एकप्रकारे त्यांनी यातून गद्दारांना इशारा दिला होता. महाविकास आघाडी मजबूत, सरकार अडीच वर्षे पूर्ण करून सत्तेत राहील असेही राऊत म्हणाले होते. अल्टिमेटम संपले आहे, असे सांगून संजय राऊत यांनी इशारा दिला.
एकनाथ शिंदे यांचे पत्र - संजय राऊत यांनी इशारा दिल्यानंतर फुटीर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनीही पत्र लिहून आमदारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. आपली आणि आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा बेकायदेशीरपणे काढून घेतल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे. आम्ही कुणा एका पक्षाचे आहोत म्हणून आम्हाला सुरक्षा दिली नव्हती. तर आम्हाला धोका आहे म्हणून सुरक्षा दिली होती, असे शिंदे त्यांच्या पत्रात लिहितात. तसेच आता महाविकास आघाडी सरकारमधील लोकांच्याकडूनच आम्हाला धोका आहे. त्यामुळे आम्हाला राज्य सोडून जावे लागल्याचीही भीती शिंदे यांना पत्रात व्यक्त केली आहे. सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेचे खच्चिकरण केले आहे. आमदारांच्या संरक्षणाची जवाबदारी राज्य सरकरावर आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने आमची सुरक्षा काढल्याचा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन प्रसिद्ध केलेल्या पत्रात केला आहे. यामुळे आपण आणि आपले कुटुंबीय धोक्यात आल्याचे शिंदे म्हणतात.
राज्यात राडेबाजीला सुरूवात - संजय राऊत यांच्या गर्भित इशाऱ्यानंतर पुण्यात राडेबाजीला सुरूवात झाली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेले आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक होत राज्यभर आंदोलन करत आहेत. पुणे शहर शिवसेना पक्ष हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून शहरात कोणीही बंड पुकारणार नाही अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी व्यक्त केली आहे. पुणे शहरातील सर्व कार्यकर्ते हे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून कोणीही बंड नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाही.आम्ही शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पक्षप्रमुख यांच्या सोबत असल्याचं यावेळी मोरे यांनी सांगितले आहे. येथील कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले. ज्या नेत्यांनी बंड पुकारला आहे. त्या नेत्यांच्या विरोधात येत्या 2 दिवसात पुणे शहर शिवसेना पक्षच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येणार आहे, असे यावेळी मोरे यांनी सांगितले.
मुंबई ठाणे मध्ये कलम 144 - राज्यातील वातावरण तंग होत असताना खबरदारीचे उपायही केले जात आहेत. राडेबाजी होऊ नये यासाठी जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. ठाणे आणि मुंबईत ही खबरदारी घेण्यात येत आहे. 10 जुलैपर्यंत या शहरांमध्ये जमावबंदी करण्यात आली आहे.
गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण - दरम्यान आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था काढली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासंदर्भातील पत्रातील उल्लेख आणि बातम्या खोट्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुणाचीही सुरक्षा काढण्याचा प्रश्नच नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
पुण्यात सुरू झालेले हे आंदोलन पुढे राज्यभर पसरण्याचा अंदाज आहे. जर राज्यात हे आंदोलन पसरले तर राज्यभर वणवा भडकण्याची शक्यता आहे.