नवी दिल्ली - शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Meets Priyanka Gandhi ) यांनी मंगळवारी राहुल गांधीची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी सांयकाळी त्यांनी प्रियंका गांधींची भेट घेतली आहे. प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष घालत आहेत. अशात गोवा आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत उतरण्यावर शिवसेना आग्रही असताना ही भेट महत्वाची आहे. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. प्रियंका गांधीच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी मोठ वक्तव्य केलं.
ही बैठक सकारात्मक होती. आम्ही उत्तर प्रदेश आणि गोव्यात एकत्र काम करण्याचा विचार करत आहोत. विरोधकांची एकच आघाडी हवी, असे संजय राऊत म्हणाले. येत्या काळात उत्तर प्रदेश व गोवामध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आता शिवसेनेकडूनही या निवडणुकांसाठी काँग्रेसशी हातमिळणी करण्याचे संकेत देण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह आहेत.
संजय राऊत यांनी मंगळवारी नवी दिल्ली काँग्रस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. या बैठकीनंतर बोलताना संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या भेटीत राजकीय विषयांवर चर्चा केल्याची माहिती दिली. विरोधकांच्या एकजुटीसाठी राहुल गांधींनी पुढाकार घ्यावा अशी प्रतिक्रिया राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी दिली आहे. भक्कम पर्याय देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. यामुळे शिवसेनेला राहुल गांधींचं नेतृत्त्व मान्य असल्याची चर्चा मात्र यानिमित्तानं सुरू झाली आहे.