नवी दिल्ली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्रातील अनुभवी राजकारणी असून पक्षाध्यक्षपद सोडल्यानंतर राष्ट्रवादीची लोकप्रियता आणि ताकद निश्चितच घटणार आहे.
महाविकास आघाडीचे भवितव्यही अंधकारमय : पवार साहेबांनी पक्षाध्यक्षपदावरून निवृत्ती घेतल्याने महाविकास आघाडीचे भवितव्यही अंधकारमय झाल्याचा दावा श्री रामदास आठवले यांनी केला. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.रामदास आठवले म्हणाले की, देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या लोकप्रियतेमुळे आणि महाराष्ट्र सरकारच्या विकास आणि रोजगार धोरणामुळे जनतेचा महाविकास आघाडीवरील विश्वास आधीच कमी झाला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा परिणाम म्हणून मा. शरद पवार यांच्या राजीनाम्याचे पडसाद उमटले आहेत.
राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व : 'शरद पवार यांच्याशी माझे खूप जवळचे संबंध आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले; केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणुन त्यांनी काम पाहिले आहे. त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. राजकीय पटलावर त्यांनी आपल्या नेतृत्वाची अमिट छाप सोडली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवले आहे. महाराष्ट्रात प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांच्यासारखा दुसरा नेता राष्ट्रवादीला मिळू शकत नाही. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असुरक्षित होईल. राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार यांच्याइतके नेतृत्व दुसरा कोणताही नेता देऊ शकत नाही, असेही आठवले म्हणाले.
सबका साथ सबका विकास, सबका विश्वास : यावरूनही महाविकास आघाडीत काहीच बरोबर नसल्याचे दिसून येते. महाराष्ट्राची जनता केंद्र सरकार नरेंद्र मोदी, एनडीएच्या पाठीशी उभे असून, सबका साथ सबका विकास, सबका विश्वास सबका प्रयत्न या धोरणाचा अवलंब करत लोकसभा निवडणुकीत सर्व 48 जागांवर एनडीएचा विजय निश्चित करण्यासाठी काम करणार आहे.