जयपूर - राजस्थानच्या चूरु जिल्ह्यातील कोलासर येथील एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला शिक्षकाने निर्दयी मारहाण केली. मारहाणीत त्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या मुलाने होमवर्क केला नव्हता, इतकाचा तो गुन्हा.
अनेक दिवसांपासून सुरू होती मारहाण-
होमवर्क न करता शाळेत का आलास? म्हणून शिक्षकाचा राग अनावर झाला. त्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. सालासर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलासर रहिवासी ओमप्रकाश यांनी तक्रार दाखल केली आहे. ओमप्रकाश यांचा मुलगा गणेश खासगी झाळा मॉर्डन पब्लिक स्कूलमध्ये सातवीत शिकतो. गेल्या २-३ महिन्यापासून तो शाळेत जात आहे. गणेशने त्याच्या वडिलांना १५ दिवसापूर्वी सांगितलं होतं की, त्याचे शिक्षक मनोज विनाकारण त्याला मारहाण करतात. बुधवारी गणेश शाळेत गेला होता. तेव्हा जे घडलं त्याने गणेशच्या कुटुंबाला धक्काच बसला.
शिक्षक म्हणाले, मरणाचं नाटक करतोय... -
सकाळी सव्वा नऊच्या सुमारास गणेशचे वडील ओमप्रकाश यांना शाळेतील शिक्षक मनोज यांचा फोन आला. ते म्हणाले की, गणेश होमवर्क न करता वर्गात बसला होता. त्यामुळे त्याला मारलं त्यात तो बेशुद्ध झाला आहे. शेतात काम करणारे वडील तातडीने शाळेत धावत आले. त्यांनी गणेशला पाहिलं तेव्हा हा बेशुद्ध झालाय की त्याचा मृत्यू झालाय? असं आरोपी शिक्षकाला विचारला. तेव्हा शिक्षकाने तो मरण्याचे नाटक करतोय असे सांगितले. वडील आरोपी शिक्षकाला जाब विचारत होते तेव्हा गणेशची आईही तिथे उपस्थित झाली. शाळेतील बाकीचे मुलं खूप घाबरलेल्या अवस्थेत होती. वर्गातील मुलांनी सांगितले की, मनोजने गणेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जमिनीवर आपटून मारलं. या मारहाणीत गणेशला प्रचंड मार बसला असं ते म्हणाले.
हत्येचा गुन्हा दाखल -
कुटुंबीय शाळेत पोहचल्यानंतर जखमी अवस्थेत गणेशला सालासरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी गणेशला मृत घोषित केले. मृत गणेशच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिक्षक मनोज कुमार याच्याविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईत आरोपी शिक्षकाला अटक केली.