बडोदा- गुजरातमधील बडोदा हायवेवर आज पहाटे भीषण अपघात झाला. यात ११ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना जवळच्याच एसएसजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच आणखी एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता..
बडोदा-अहमदाबाद महामार्गावर वाघोडीया चौकात हा भीषण अपघात झाला. डंपर आणि मिनी बसमध्ये धडक होऊन हा अपघात झाला. अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यासह अन्य अधिकाऱ्यांनी जखमींची विचारपूस करण्यासाठी रूग्णालयाकडे धाव घेतली आहे. एक लहान मुलासह दोन महिला आणि दोन पुरूषांसह दहा जण या अपघातात ठार झाले आहेत.
कोठारियामध्येही अपघात..
यासोबतच, सुरेंद्रनगर-लखतर रस्त्यावर असणाऱ्या कोठारिया गावाजवळ एका चारचाकीचा अपघात झाला. यात गाडीतील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
सूरत-धुळे महामार्गावर अपघात..
सूरत-धुळे महामार्गावर कदोडरा बारडोलीमध्ये एका चौकात दोन बसची समोरासमोर टक्कर झाली. या दुर्घटनेत २० लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातातील जखमींना सूरतच्या स्मीमेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोठ्या अपघातांवर एक नजर..
मध्य प्रदेशातील शिवपुरीत झालेल्या अपघातात ११ ठार
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील पोहरी पोलीस ठाणे परिसरातील काकरा गावाजवळ १४ नोव्हेंबर (शुक्रवारी) भीषण अपघात झाला होता. या अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त पिकअप गाडीत 40 लोक होते. यातील 15 जण वाहनाखाली दबले होते. यापैकी 8 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तिघांचा रुग्णालयात पोहोचल्यानंतर मृत्यू झाला होता.
महाराष्ट्र ऐन दिवाळीत ८ जणांना रस्ते अपघातात गमवावा लागला जीव
ऐन दिवाळीत दोन वेगवेगळ्या अपघातात 8 जणांनी आपले प्राण गमावले होते. तर 19 जण जखमी झाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात झाला होता. या अपघातात 3 जण ठार झाले तर 13 जण जखमी झाले होते. दुसरा अपघात पुणे- बंगळुरू आशियाई महामार्गावर उंब्रज (ता.कराड) येथ झाला होता. तारळी नदीच्या पुलाचा कठडा तोडून ट्रॅव्हलर बस 50 फूट खोल नदीपात्रात कोसळली. यामध्ये ट्रॅव्हलरमधील 5 जण जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभिर जखमी होते. हा अपघातही १४ नोव्हेंबरला झाला.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही अपघात
११ नोव्हेंबर ला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जवळ काच वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता. यात 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले होते. तलासरी तालुक्यातील वडवली गावाजवळ ही घटना घडली होती.
हेही वाचा : मोदींनी बायडेन यांच्या बरोबर साधला संवाद; कोरोना आणि परस्पर सहकार्याबाबत केली चर्चा