नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनावर फक्त लसीकरणातूनच नियंत्रण मिळवता येऊ शकते. 16 जानेवरीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहीम मंदावली होती. यातच सीरम इन्स्टिट्यूटने आनंदाची बातमी दिली आहे. सीरम 9 ते 10 कोटी डोस देणार सरकारला देणार आहे. देशात 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहीमेअंतर्गत आतापर्यंत 21 कोटी लस टोचवण्यात आल्या आहेत.
जूनमध्ये कोविशिल्डचे 9 ते 10 कोटी डोसचे उत्पादन आणि पुरवण्यात येतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटलं. कर्मचारी लस उत्पादनासाठी दिवस रात्र प्रयत्न करत आहेत. भारत सरकारच्या सहकार्याने आम्ही पूर्ण क्षमता वापरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
तीन लसींद्वारे लसीकरण -
देशात सध्या दोन लसींद्वारे लसीकरण मोहीम सुरू आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस दिली जात आहे. यातच लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने रशियाच्या स्पूटनिक व्ही लसीला देशात मंजुरी देण्यात आली आहे. देशभरातील अपोलो रुग्णालयांमध्ये 'स्पूटनिक व्ही' ही कोरोना लस देण्यात येणार आहे. स्पूटनिक व्ही लशीची किंमत अपोलो रुग्णालयात 1 हजार 195 रुपये असणार आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून अपोलो रुग्णालयामध्ये स्पूटनिक व्ही लस मिळेल. स्पूटनिक व्ही लसीची किंमत 995 रुपये आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
- गेल्या 24 तासातील नवे रुग्ण -– 1,65,553
- गेल्या 24 तासात डिस्चार्ज दिलेले रुग्ण - 2,76,309
- गेल्या 24 तासांतील मृत्यू – 3,460
- एकूण रूग्ण -– 2,78,94,800
- एकूण डिस्चार्ज – 2,54,54,320
- एकूण मृत्यू – 3,25,972
- एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 21,14,508
- गेल्या 24 तासातील लसीकरण संख्या - 30,35,749
- आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या -– 21,20,66,614
- गेल्या 24 तासात झालेल्या चाचण्या - 20,63,839
- एकूण चाचण्यांची आकडेवारी - 34,31,83,748