मुंबई - अँटिलिया स्फोटके आणि मनसुख प्रकरणात वाझेंना अटक होताच परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली. या प्रकरणात सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला.
परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली. आज उच्च न्यायालयात अर्ज दाखल करू, असे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले. कपिल सिब्बल यांनी राज्याची, तर मुकुल रोहतगी यांनी परमबीर सिंग यांची बाजू मांडली. एस कौल आर रेड्डी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
काय म्हटलयं याचिकेत ?
याचिकेत परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून करण्यात आलेली बदली ही चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच याचिकेमध्ये सीबीआयची चौकशीची मागणी करण्यात आली होती. तब्बल 130 पानांच्या याचिकेमध्ये परमबीर सिंग यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचा दाखला दिला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरी सुविधा कक्षाचे अधिकारी संजय पाटील आणि मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या दोघांना त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. तसेच महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करावी, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोपही परमबीर सिंग यांनी केला. तसेच माझे आरोप खोटे असतील तर देशमुख यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासावेत, असेही त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. सचिन वाझे आणि संजय पाटील यांना कधी-कधी गृहमंत्र्यांनी बोलावले होते, याबद्दल हेच अधिकारी सांगू शकतात, असेही परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.
गृह खात्यात सुरू असलेल्या या प्रकाराबद्दल मी प्रत्यक्ष जाऊन तोंडी मुख्यमंत्र्यांना सांगितले असते, तर त्या संदर्भातील पुरावा राहिला नसता, असा दावाही परमबीर सिंग यांनी केला आहे. लेखी पुरावा म्हणून मी पत्र लिहिले आहे. मेल केलेला होता. मात्र, त्यावर सही केली नव्हती, असेही सिंग यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या समोर चौकशीला हजर होण्यापूर्वी सचिन वाझे यांनी जगाला गुडबाय करावा, असे वाटत असल्याचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते. त्यावेळेस परमबीर सिंग यांनी सचिन वाझे यांना बोलावून समजवण्याचा प्रयत्न केला होता, असेही समोर येत आहे.
का दाखल केली याचिका?
जवळपास एक वर्षापूर्वी परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्ताची धुरा सांभाळली होती. मात्र सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट नैतिक जबाबदारी म्हणून परमवीर सिंग यांची थेट तडकाफडकी बदली केली. त्यानंतर परमविर सिंह हे नाराज असल्याची चर्चा पोलीस विभाग तसेच राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यानंतर थेट परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अवैद्यरित्या आपल्याला महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याच सांगितलं असल्याचं पत्रात नमूद केलं. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, यासाठी परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
परमबीर सिंग कोण आहेत?
परमबीर सिंग हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून सिंग यांची ओळख आहे. गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या सरकारमधील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागापूर्वी त्यांनी ठाण्याचे आयुक्त म्हणून 2016 मध्ये काम पाहिले होते. ठाणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्या टीमने मीरारोड भागात फेक कॉलसेंटर छापा मारला होता.भारतातील या सर्वांत मोठ्या फेक कॉलसेंटरच्या तपासासाठी एफबीआयची टीम भारतात आली होती. त्यांच्याच कार्यकाळात अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्यांना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यस्थेचा यापदी नेमण्यात आले. अतिरिक्त पोलीस महासंचालक असताना कोरेगाव भीमा प्रकरणात त्यांनी स्वतः लक्ष घालत हे प्रकरण हाताळले होते. गेल्यावर्षीच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लिनचिट सिंग यांनीच दिली होती.
हेही वाचा - 'ती' कागदपत्रे म्हणजे भिजलेला लवंगी फटाका; त्याला वातही नव्हती - संजय राऊत