नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरुर, आणि राजदीप सरदेसाई यांच्यासह सहा पत्रकारांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नोएडामध्ये या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्लीमधील ट्रॅक्टर परेडच्या वेळी झालेल्या हिंसाचाराबाबत सांप्रदायिक तणाव निर्माण करणाऱ्या आणि भडकवणाऱ्या बातम्या प्रसारीत करुन नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप या सर्वांवर करण्यात आला होता.
शशी थरुर यांच्यासह सर्वांना दिलासा..
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या एका खंडपीठासमोर याबाबतची सुनावणी झाली. शशी थरुर, पत्रकार राजदीप सरदेसाई, मृणाल पांडे, जफर आगा, परेशनाथ, अनंत नाथ आणि विनोद यांनी तसेच केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकांबाबत ही सुनावणी सुरू होती. याबाबत नोटीस जारी करत, न्यायालयाने या सर्वांकडून उत्तर मागितले आहे.
दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी..
या सर्वांनी उत्तर देईपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी थरुर यांचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. यावर प्रतिक्रिया देत खंडपीठाने या सर्वांच्या अटकेला स्थगिती दिली. तसेच, याप्रकरणी दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमण्यण यांचाही समावेश होता.
तीन ठिकाणी गुन्हे दाखल..
२६ जानेवारीला केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन शेतकऱ्यांनी केले होते. या रॅलीवेळी दिल्लीमध्ये ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर २९ जानेवारीला नोएडामध्ये, ३० जानेवारीला दिल्लीमध्ये तसेच, मध्य प्रदेशमध्येही या सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा : उत्तराखंडमधील मदतकार्यावर केंद्राची २४ तास नजर; मृतांना संसदेत श्रद्धांजली