मुंबई - खासदार संजय राऊत यांचा एक खळबळजनक ऑडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते एका महिलेला मालमत्तेबाबत गलिच्छ शब्दात शिवीगाळ करत आहेत आहेत. संजय राऊत एका महिलेशी आपल्या नावावर मालमत्ता केल्यामुळे वाद घालत आहेत. संजय राऊत या महिलेशी आणखी वाद घातल्यास तिच्यावर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकीही देत आहेत. मात्र, ईटीव्ही भारत या ऑडिओला दुजोरा देत नाही.
काय आहे प्रकरण? १०३४ कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावल्यानंतरही ते गुरुवार, २८ जुलै रोजी ईडीसमोर हजर झाले नाहीत. या सगळ्यामध्ये एक ऑडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना धमक्या येत आहेत आणि संजय राऊत यांच्या विरोधात दिलेले वक्तव्य मागे घेण्यास सांगितले जात आहे. या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर हिने गेल्या आठवड्यात मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दाखल केली होती, तिने ईडीसमोर जबाब दिल्यास बलात्कार आणि खून करण्याची धमकी दिली होती.
किरीट सोमैया यांची संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार - शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमैया आज वाकोला पोलीस ठाण्यात दाखल झाले. सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्पिल व्हायरल होतेय. या ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. या ऑडिओ क्लिपमधला आवाज हा संजय राऊत यांचाच असल्याचा दावा सोमैया यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि राऊतांवर कारवाई व्हावी, अशी मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे. या मागणीसाठीच त्यांनी आज वाकोला पोलीस ठाण्यात जावून आपली भूमिका मांडली.
किरीट सोमैया नेमके काय म्हणाले? किरीट सोमैया यांनी वाकोला पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत शिवीगाळ आणि धमकी देत आहेत. संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांसमोर मलाही अनेकदा शिवीगाळ केली आहे. त्यामुळे मला काळजी वाटत आहे. स्वप्ना पाटकर या महिलेच्या सुरक्षेसाठी मी मुंबई पोलिसांना विनंती केली आहे. या महिलेला काही झालं तर त्याला जबाबदार पोलीस असतील. पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणार आणि स्वप्ना पाटकर यांना सुरक्षा देणार, असे आश्वासन दिले आहे. माझी या प्रकरणी राज्य महिला आयोगासोबत बातचित झाली आहे. त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे. या ऑडिओ क्लिपचा मुद्दा उपस्थित होवून २४ तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. त्यांनी या प्रकरणातील आपल्या आरोपांचं खंडन केलेलं नाहीय. याचा अर्थ हाच आहे की, त्यांनी एका महिलेला शिवीगाळ आणि धमकी दिली आहे. महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे", असे किरीट सोमैया म्हणाले.