नवी दिल्ली : साहित्य अकादमीने (sahitya akademi) गुरुवारी साहित्य अकादमी पुरस्कार 2022 (sahitya akademi award 2022) जाहीर केला. (sahitya akademi award 2022 announced). प्रसिद्ध हिंदी कवी बद्री नारायण (Badri Narayan) यांना त्यांच्या 'तुमडी के शब्द' या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्याचवेळी 'ऑल द लाईक्स वी नेव्हर लिव्हड' या इंग्रजी कादंबरीसाठी अनुराधा रॉय तर काला पानी या तमिळ कादंबरीसाठी एम. राजेंद्रन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांना दिला जातो.
24 भाषांमधील पुस्तकांसाठी पुरस्कार : अकादमी दरवर्षी 24 मान्यताप्राप्त भारतीय भाषांमधील उत्कृष्ट पुस्तकांसाठी वार्षिक पुरस्कार आणि अनुवाद पुरस्कार जाहीर करते. अकादमीचे सचिव के. श्रीनिवास राव यांनी ही घोषणा केली. 23 भारतीय भाषांसाठी जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांमध्ये सात काव्यसंग्रह, सहा कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, दोन साहित्यिक समीक्षा, तीन नाटके, एक आत्मचरित्रात्मक निबंध, एक संक्षिप्त सिंधी साहित्यिक इतिहास आणि एक लेख संग्रह यांचा समावेश आहे. बांगला भाषेतील पुरस्काराची घोषणा नंतर केली जाईल.
पुरस्काराचे मानकरी :
- कविता : रश्मी चौधरी (बर), बद्री नारायण (हिंदी), अजित आझाद (मैथिली), कोईजम शांतीबाला (मणिपुरी), गायत्रीबाला पांडा (ओडिया), जनार्दन प्रसाद पांडे 'मणि' (संस्कृत), काजली सोरेन (संताली). तर कथेसाठी मनोज कुमार गोस्वामी (आसामी), सुखजीत (पंजाबी).
- कादंबरी : अनुराधा रॉय (इंग्रजी), माया अनिल खरंगटे (कोंकणी), प्रवीण दशरथ बांदेकर (मराठी), एम. राजेंद्रन (तमिळ), मधुरांतकम नरेंद्र (तेलुगू), अनीस अश्फाक (उर्दू).
- साहित्यिक टीका : फारुख फयाज (काश्मिरी) आणि एम. थॉमस मॅथ्यू (मल्याळम).
- नाटक : वीणा गुप्ता (डोगरी), केबी नेपाळी (नेपाळी), कमल रंगा (राजस्थानी).
- आत्मचरित्रात्मक निबंध : गुलाम मोहम्मद शेख (गुजराती).
- लेख संग्रह : मुदानकुडू चिन्नास्वामी (कन्नड) आणि कन्हैयालाल लेखवाणी (सिंधी) यांना संक्षिप्त सिंधी साहित्य इतिहासासाठी पुरस्कार देण्यात आला आहे.
हिंदी भाषेतील आतापर्यंतचे मानकरी : 2021 साली ज्येष्ठ साहित्यिक दया प्रकाश सिन्हा यांना हिंदीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 'सम्राट अशोक' या नाटकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हिंदी लेखिका अनामिका ह्यांची साहित्य अकादमी पुरस्कार 2020 साठी निवड झाली होती. तर नंद किशोर आचार्य यांना 2019 मध्ये हिंदी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या 'चेलते हुए अपने को' या कवितेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 2018 मध्ये हिंदी लेखिका चित्रा मुदगल यांना त्यांच्या कादंबरीसाठी 'पोस्ट बॉक्स नं. 203 - 'नाला सोपारा'साठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.