लक्सर (उत्तराखंड) : उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील लक्सर भागातील रायसी रेल्वे स्टेशनजवळ ट्रेनला आग लागल्याची अफवा उडाल्यानंतर ट्रेनमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यातच रेल्वे चालकाने बाणगंगा नदीच्या पुलावर गाडी थांबविल्याने प्रवाशांमध्ये आणखी घबराट वाढली. यानंतर प्रवासी जीव धोक्यात घालून ट्रेनमधून खाली उतरायला लागले, तर अनेक जण जीव वाचवण्यासाठी पुलाच्या काठावरुन धावताना दिसले.
प्रवाशांनी जीव धोक्यात घालून पूल ओलांडला : मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊहून चंदीगडला जाणारी सद्भावना एक्स्प्रेस रविवारी लक्सर भागातील रायसी रेल्वे स्थानकाजवळ पोहोचताच कोणीतरी ट्रेनची चेन खेचली. साखळी ओढताच ट्रेन बाणगंगा नदीवर थांबली आणि ट्रेनच्या ब्रेकमधून धूर निघू लागला. धूर पाहून ट्रेनमधील प्रवाशांना ट्रेनला आग लागली असे वाटले. आगीची बातमी पसरताच प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर रेल्वेतील प्रवासी बाणगंगा नदीवर बांधलेल्या पुलावर उतरायला लागले. त्यावेळी बाणगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. प्रवासी जीव धोक्यात घालून पूल ओलांडत होते. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि ट्रेनचे ब्रेक ठीक करून ट्रेन पुढे पाठवण्यात आली.
जीव वाचवण्यासाठी नदीत उड्या मारल्या : ट्रेन बाणगंगा नदीच्या पुलावर सुमारे तासभर उभी होती, असे सांगण्यात येत आहे. यावेळी प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली होती. काही प्रवाशांनी तर जीव वाचवण्यासाठी नदीत उड्या मारल्याचेही सांगण्यात येत आहे. एका स्थानिक रहिवाशाने या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. रायसी रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर ओम प्रकाश यांनी ईटीव्ही भारतला फोनवर सांगितले की, ट्रेनचे ब्रेक जाम झाले होते. त्यानंतर ट्रेनच्या चाकांमधून धूर निघू लागला. धुराचे लोट वाढत असल्याचे पाहून लोकांना ट्रेनला आग लागली, असे वाटले. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
हेही वाचा :