नवी दिल्ली : राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) प्रमुख अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. मंगळवारी रात्री अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसांमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती.
दोन दिवसांपासून होते व्हेंटिलेटरवर..
२२ एप्रिलला अजित यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर हळू-हळू त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संक्रमण वाढत गेले. मंगळवारी त्यांची तब्येत अधिक खराब झाल्यामुळे त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. आज (गुरुवार) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र अजित सिंह सात वेळा खासदार राहिले आहेत. तसेच, ते माजी केंद्रीय मंत्रीही होते. त्यांच्या जाण्यामुळे रालोद कार्यकर्त्यांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे.
अजित सिंह यांचा पश्चिमी उत्तर प्रदेशात दबदबा..
अजित सिंह यांचा पश्चिमी उत्तर प्रदेशात मोठा दबदबा होता. जाट समुदायाचे ते मोठे नेते होते. दुर्दैवाने कित्येक वेळा केंद्रीय मंत्री राहिलेल्या अजित यांच्या पक्षाची कामगिरी गेल्या काही निवडणुकांमध्ये अतिशय खराब होती. अजित सिंह यांचा गड समजला जाणाऱ्या बागपतमध्येही ते निवडणूक हरले होते. तसेच, त्यांचे पुत्र जयंत चौधरींनाही लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता.
हेही वाचा : 'आसाराम'ला कोरोनाची लागण; तुरुंगातून आयसीयूमध्ये हलवले