नवी दिल्ली Rishi Sunak India Visit : भारतात होणाऱ्या जी २० शिखर परिषदेच्या निमित्तानं अनेक देशांचे प्रमुख सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्यासह रशिया आणि मॉरिशसचे पंतप्रधान आणि अनेक देशांचे प्रतिनिधी नवी दिल्लीत पोहोचले आहेत.
ऋषी सुनक ब्रिटिश कौन्सिलच्या मुख्यालयात पोहोचले : जी २० परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा यावेळी देसी लूक पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषी सुनक परिषदेपूर्वी राजधानी नवी दिल्लीतील ब्रिटिश कौन्सिलच्या मुख्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी स्थानिक शाळेतील काही मुलांची भेट घेतली. यावेळी सुनक यांच्यासोबत त्यांची पत्नी अक्षरा मूर्तीही उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे काही खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर केली पोस्ट : या शाळेतील मुलांना भेटताना ऋषी सुनक आणि अक्षरा मूर्ती खूप आनंदी आणि प्रसन्न दिसत होते. त्यांनी मुलांशी खूप गप्पा मारल्या. तसेच मुलांना अनेक प्रश्नही विचारले. या भेटीनंतर ऋषी सुनक यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. 'आजच्या जागतिक नेत्यांना भेटण्यापूर्वी मी उद्याच्या जागतिक नेत्यांना भेटत आहे. भारतातील ब्रिटिश कौन्सिलमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना भेटून खूप आनंद झाला. हे युनायटेड किंगडम आणि भारत या दोन देशांदरम्यान अस्तित्वात असलेल्या जिवंत पुलाचं प्रतिबिंब आहे', असं सुनक म्हणाले.
कॅनॉट प्लेसला दिली भेट : ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षरा मूर्ती शुक्रवारी संध्याकाळी उशिरा नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेसला पोहचले. तिथं त्यांनी लोकांशी संवाद साधला आणि फोटोही क्लिक केले. तत्पूर्वी, दिल्लीच्या पालम विमानतळावर पोहोचताच सुनक आणि त्यांच्या पत्नीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांनी अक्षरा मूर्ती यांना भारताची मुलगी आणि ऋषी सुनक यांना भारताचे जावई असं संबोधित केलं.
हेही वाचा :