चमोली - उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमसस्खलनाची दुर्घटना होऊन आज अठरा दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही बचावकार्य सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ७० मृतदेह आणि २९ मानवी अवयव बचावपथकाच्या हाती लागले आहेत. अद्यापही अनेक कामगार बेपत्ता आहे. काल (बुधवार) दिवसभरात एकही मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला नाही.
४० मृतदेहांची ओळख पटली -
७० मृतदेहांपैकी ४० मृतदेहांची ओळख पटली आहे. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेहांची ओळख पटविणे अवघड जात आहे. उत्तराखंड पोलीस, केंद्रिय आणि राज्य आपत्ती निवारण पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. जेसीबी पोकलेनच्या मदतीने ऊर्जा प्रकल्पांच्या बोगद्यातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. रैनी गावातही बचावकार्य सुरू आहे. घटना घडून १८ दिवस झाल्याने बपत्ता कामगार जिवंत असल्याची शक्यता मावळत चालली आहे. ओळख पटलेल्या मृतदेहांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
७ फेब्रुवारीला कोसळला हिमकडा -
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ७ फेब्रुवारीला हिमकडा कोसळून नदीला पूर आला होता. या नदीमार्गावर ऋषीगंगा आणि तपोवन या दोन ऊर्जा प्रकल्पांचे काम सुरू होते. अनेक कामगार प्रकल्पाच्या बोगद्यासह विविध भागात काम करत असताना अचानक पुराचा लोंढा आला. यात अनेक कामगार वाहून गेले. तर काही बोगद्यात अडकले. पुरात चिखल, दगड, माती मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने आपत्तीची भीषणता आणखी वाढली.