नवी दिल्ली - येत्या तीन ते पाच वर्षांत रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकी असलेली रिलायन्स रिटेल तिप्पटीने वाढणार असल्याचे कंपनीचे चेअरम मुकेश अंबानी यांनी गुरुवारी सांगितले. ते रिलायन्स इंडस्ट्रीच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बोलत होते. रिलायन्स रिटेलच्या प्रगतीमुळे १० लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचेही अंबानी यांनी यावेळी सांगितले.
रिटेलमध्ये जगात सर्वाधिक वेगाने वाढण्यात कायम राहणे आणि आणि रिटेलमध्ये जगातील पहिल्या दहामध्ये येण्याचे रिलायन्स रिटेल कंपनीचे उद्दिष्ट आहे. रिलायन्स रिटेल ही पुरवठा साखळी आणि संचलन क्षमता वाढविण्यासाठी नवीन कंपन्या ताब्यात घेणार आहे. डिजीटल प्लॅटफॉर्म नेटमॅड, अर्बन लॅडर आणि झिव्हामी विकत घेतल्याचे मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत सांगितले.
हेही वाचा-२३४५ कोटींची बँकांची फसवणूक; उद्योगपती गौतम थापरविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल
काय म्हणाले मुकेश अंबानी-
- येत्या तीन वर्षात ई-कॉमर्स कंपनी असेल्या जीओमार्टध्ये १ कोटी व्यापारी भागीदार आणण्याचे कंपनी नियोजन करत आहे.
- रिलायन्स रिटेलचे स्टोअर आणि डिलिव्हरी हबचे येत्या काही वर्षांत वाढणार आहे.
- आव्हाने असतानाही रिलायन्स रिटेलने मागील आर्थिक वर्षात १,५३,८१८ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. तर आर्थिक वर्ष २०२१ मध्ये करापूर्वीचा फायदा हा ९,८४२ कोटी रुपये आहे. ग्रोसरी, इलेक्ट्रोनिक्स, कपडे अशा प्रत्येक वर्गवारीत आघाडीवर असण्याच्या जवळ आहोत.
- रिलायन्स रिटेलकडून संशोधन, डिझाईन आणि उत्पादन विकास क्षमता वाढविण्यासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे.
- कोरोना महामारी असतानाही मागील आर्थिक वर्षात रिलायन्स रिटेलने नवीन १,५०० स्टोअर वाढविले आहेत. कोरोनाच्या काळात रिटेलचा हा सर्वाधिक विस्तार आहे. रिलायन्स रिटेलचे देशात १२,७११ स्टोअर आहेत.
हेही वाचा-अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआयचौकशीचा प्रस्ताव कार्यकारणीत पारित
जिओफोन नेक्स्ट १० सप्टेंबरला लाँच होणार
जगातील सर्वात परवडणाऱ्या दरातील ४जी फोन असलेला जिओफोन नेक्स्ट हा १० सप्टेंबरला लाँच होणार आहे. ही माहिती रिलायन्स इंडस्ट्रीज लि. (आरआयएल) कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या ४४व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (एजीएम) दिली आहे. या स्मार्टफोनसाठी रिलायन्स जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासाठी गुगलबरोबर भागीदारी करणार आहे.