नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वंदे भारत ट्रेनसह इतर ट्रेनच्या तिकिटांच्या दरात कपात होणार आहे. रेल्वे बोर्डाने एका आदेशात म्हटले आहे की, वंदे भारत आणि अनुभूती व विस्टाडोम कोच असलेल्या सर्व गाड्यांमधील एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे प्रवाशांच्या संख्येनुसार 25 टक्क्यांपर्यंत कमी केले जातील.
एसी कोच असलेल्या गाड्यांमध्ये मिळणार सवलत : ट्रेनमध्ये जास्तीत जास्त सीटचे आरक्षण व्हावे, यासाठी ही कपात केली जाणार असल्याचे रेल्वेने सांगितले. त्यासोबतच, रेल्वेचे भाडे आता स्पर्धात्मक पद्धतीने ठरवले जाणार आहे. रेल्वेमधील सर्व आरामदायी सुविधांचा वापर प्रवाशांना करता यावा, यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. आता एसी कोच असलेल्या गाड्यांमध्ये सवलतीच्या दराची ही योजना लागू होणार आहे.
मूळ भाड्यावर 25 टक्क्यांपर्यंत सूट : रेल्वेची ही नवी योजना एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना लागू होणार आहे. यामध्ये वंदे भारत एक्स्प्रेससह अनुभूती आणि व्हिस्टाडोम कोच असणाऱ्या रेल्वेंचाही समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, मूळ भाड्यावर 25 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. मात्र आरक्षण शुल्क, सुपर फास्ट सरचार्ज, जीएसटी यासारखे इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारले जातील.
या गाड्यांमध्ये मिळणार सवलत : मागील 30 दिवसांत ज्या गाड्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी जागांचे आरक्षण झाले, त्या गाड्यांमध्ये सवलत देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही सवलत तात्काळ लागू केली जाणार आहे. रेल्वेच्या आदेशानुसार, ही सवलत त्वरित प्रभावाने लागू होणार आहे. तसेच ज्यांनी आधीच तिकीट बुक केले आहे अशा प्रवाशांना मात्र भाडे परत मिळणार नाही.
बऱ्याच दिवसांपासूनची मागणी होती : वंदे भारतसह इतर सुपरफास्ट एक्स्प्रेसचे तिकीट जास्त असल्यामुळे प्रवासी तिकीटांचे दर कमी करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून करत होते. त्या अनुषंगाने आता रेल्वेने तिकिटांच्या किमती कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक व्यवहार्य बनवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :