भोपाळ - भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये आग लागून दहा नवजात बालकांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनेची दखल बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) घेतली आहे. शार्ट सर्किमुळे आग लागून बालकांचा मृत्यू होण्याच्या घटनेस प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी म्हटले आहे. या घटनेचा ४८ तासांच्या आत अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला आहे, मध्यप्रदेशातली राजगढ येथे आले असता त्यांनी या घटनेची दखल घेतली.
भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडे आयोगाने ४८ तासांच्या आत अहवाल मागितला आहे. दोषींना सूट दिली जाणार नाही. ही घटना दुर्देवी असून दोषींना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत आयोग आपले काम करत राहील, असे कानूनगो म्हणाले.
'प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडली दुर्घटना'
नवजात बालकांना रुग्णालयात ठेवण्याबाबत आरोग्य मंत्रालयाची नियमावली आहे. शिशू केअर युनिट, बालकांसाठीचा अतिदक्षता विभाग कसा असावा यासंबंधी मंत्रालयाच्या गाईडलाईन्स आहेत. त्यामुळे शार्टसर्किटमुळे आग लागून मृत्यू होण्याची घटना प्रशासकीय हलगर्जीपणा आहे. या घटनेस जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा केली जाईल. भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्ही ४८ तासांच्या आत अहवाल मागितला आहे. जर आम्हाला समाधानकारक अहवाल मिळाला नाही, तर आयोगाचे पथक भंडाऱ्यात जाऊन घटनेची चौकशी करेल. जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आयोग प्रयत्न करत राहील, असे कानूनगो म्हणाले.
काय आहे घटना -
काल ९ जानेवारी (शनिवारी) भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. कामावर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर दिसून आला. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवले गेले. मात्र तरीही धुर मोठ्या प्रमाणात होता.
10 बालकांचा मृत्यू झाला
या विभागामध्ये आऊट बोर्न आणि इन बोर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बोर्न मधील असलेले सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बोर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. आग लागली तेव्हा रूग्णालयात अन्य रूग्ण ही मोठ्या प्रमामात होते. त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे ही जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. आग नक्की कशामुळे लागली याबाबत चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.