नवी दिल्ली - नवीन सोशल मीडियाच्या कायद्यावरून ट्विटर व केंद्र सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले असताना त्यात आणखी भर पडली आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांना तासभर ट्विटरचे अकाउंट लॉग इन करता आले नाही. त्यावरून केंद्रीय मंत्री यांनी ट्विटरवर पुन्हा टीका केली आहे. कंपनीकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
ट्विटरचे अकाउंट लॉग इन करता आले नसल्याने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद हे संतप्त झाले. त्यांनी पुन्हा अकाउंट लॉग इन केल्यानंतर ट्विटरविरोधात एकामागून एक ट्विट केले आहेत. ट्विटरकडून नवीन डिजीटल मीडियाच्या कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. अमेरिकेच्या कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन झाल्याने रवीशंकर प्रसाद यांचे अकाउंट काही काळ बंद झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
जाणून घ्या ट्विटर व सरकारमधील मतभेद
सोशल मीडियाच्या नवीन नियमाप्रमाणे ट्विटरने मुख्य अंमलबजावणी अधिकाऱ्याची सविस्तर माहिती दिली नव्हती. केंद्र सरकारने तंबी दिल्यानंतर ट्विटरने वकिलाची माहिती ही नोडल संपर्क व्यक्ती आणि तक्रार निवारण अधिकारी म्हणून पाठविली होती. सोशल मीडियाच्या कायद्याला ट्विटर जुमानत नसल्याचा आरोप केंद्रीय माहिती रवीशंकर यांनी वारंवार केला आहे.
हेही वाचा-रॉबर्ट वड्रा यांनी अचानक मारला कारचा ब्रेक; दिल्ली पोलिसांनी पाठविले चलन
ट्विटरच्या एमडी माहेश्वरी यांना न्यायालयाचा नुकताच मिळाला दिलासा-
कर्नाटक उच्च न्यायालयाने ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी (Twitter Managing Director Manish Maheshwari) यांना अंतरिम दिलासा दिला आहे. माहेश्वरी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने गाझियाबाद पोलिसांना कठोर पावले न उचलण्याचे निर्देश दिले आहेत. माहेश्वरी यांनी गाझियाबाद पोलिसांनी पाठविलेल्या नोटीसविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. लोणीमधील मारहाणी प्रकरणात माहेश्वरी यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले, की कंपनीचे एमडी हे कर्मचारी आहेत. त्यांचा गुन्ह्याशी काही संबंध नाही.
हेही वाचा-भाजपासारख्या पक्षाने सुडाचे राजकारण करणं दुर्दैवी - खासदार सुप्रिया सुळे
पारदर्शकतेच्या तत्वानुसार आम्ही कठोरपणे नियमांचे पालन करणार-
ट्विरटने चुकीची माहिती करणारे ट्विटर म्हणून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांचे ट्विट फ्लॅग केले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ट्विटरला नोटीस पाठविली होती. त्यावर ट्विटरने म्हटले होते, की आम्ही भारतामधील आमच्या कर्मचाऱ्यांबाबत नुकतेच घडलेल्या घटनांनी चिंतेत आहोत. लोकांना सेवा देताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका होण्याची भीती आहे. आमच्याबरोबरच भारत व जगामधील नागरी समुदाय हा पोलिसांकडून धमकाविण्याकरता वापरण्यात येणारी रणनीतीबाबत चिंतेत आहे. पारदर्शकतेच्या तत्वानुसार आम्ही कठोरपणे नियमांचे पालन करणे सुरुच ठेवणार आहोत. प्रत्येक आवाजाचे सक्षमीकरण, अभियव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि कायद्याप्रमाणे गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी बांधील असल्याचे ट्विटरने म्हटले होते.
हेही वाचा-ट्विटरकडून रवीशंकर प्रसाद यांचे अकाउंट तात्पुरते बंद; केंद्रीय मंत्र्यांनी 'हा' केला आरोप
ब्लू टिक काढल्याने ट्विटरवर झाली होती टीका-
नुकतेच ट्विटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक काढून टाकली होती. मात्र, वाद निर्माण झाल्यानंतर टि्वटरने पुन्हा ब्लू टिक बहाल केली आहे. जुलै २०२० पासून व्यंकय्या नायडू ट्विटरवर सक्रिय नव्हते. यामुळे ट्विटरच्या पडताळणी धोरणानुसार ब्लू टिक हटवण्यात आली होती, अशी माहिती ट्विटरने दिली. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा योग्य वा 'व्हेरिफाईड' अकाऊंट असल्याची खूण म्हणजे ही ब्लू टिक असते.
नियम भंग केल्याने अभिनेत्री कंगणा रणौतचे ट्विटर बंद
अभिनेत्री कंगना रणौतचे ट्विटर हँडल ४ मे २०२१ मध्ये बंद करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्रीने ट्वीटच्या करत आक्षेपार्ह भाष्य केले होते. गेल्या वर्षी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंटही ट्विटरने कायमस्वरुपी बंद केले आहे.