नवी दिल्ली : रक्षाबंधनाचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी बहिणी मोठ्या प्रेमाने भावांना राखी बांधतात. मात्र तुम्हाला माहित आहे का, की भारतात एक असंही गाव आहे जिथं रक्षाबंधनाचा सणच साजरा केला जात नाही! या गावात एका जुन्या समजुतीमुळे रक्षाबंधन साजरं केलं जात नाही. या गावातील लोकांना रक्षाबंधनाचा दिवस हा सणासारखा वाटत नाही.
'ईटीव्ही भारत'ची टीम गावात पोहचली : हे गाव उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यात स्थित आहे. येथील 'सुराना' या गावात रक्षाबंधन कधीच साजरं केलं जात नाही. या मागे कारण काय हे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत'ची टीम गाजियाबाद शहरापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या या गावात पोहोचली. गावात पोहचल्यावर 'ईटीव्ही'च्या टीमनं ग्रामस्थांशी संवाद साधला. ७५ वर्षीय राज सिंह यांनी सांगितलं की, 'त्यांना दोन सख्या बहिणी आहेत. परंतु त्यांनी कधीही राखी बांधली नाही. गावातील लोक रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले. परंतु ते देखील रक्षाबंधन साजरं करत नाहीत'.
११ व्या शतकात 'सोनगढ' म्हणून ओळखलं जात असे : गावातील लोकांच्या मते, सुराना गाव ११ व्या शतकात 'सोनगढ' म्हणून ओळखलं जात असे. राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांचे वंशज राजस्थानातून सोनगढला आले होते. त्यांनी हिंडन नदीच्या काठावर तळ ठोकला. मात्र जेव्हा मोहम्मद घोरीला कळलं की पृथ्वीराज चौहानच्या वंशजांनी सोनगढमध्ये तळ ठोकलाय, तेव्हा त्यानं सोनगढावर हल्ला केला. त्याच्या या हल्ल्यात संपूर्ण गाव उद्धवस्त झालं. त्यानं आक्रमणादरम्यान क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. महिला, लहान मुलं, वृद्ध, तरुणांना हत्तींच्या पायाखाली अक्षरश: तुडवण्यात आलं.
सर्व ग्रामस्थ 'छाबडिया' गोत्राचे आहेत : जेव्हा हा हल्ला झाला, तेव्हा गावातील एक महिला जसकौर तिच्या माहेरी गेली होती. त्यामुळं तिचा जीव वाचला. त्यावेळी जसकौर गर्भवती होती. त्यानंतर तिनं दोन मुलांना जन्म दिला. या दोन्ही मुलांना छबड्यात (कावड) बसवून ती सोनगढला आली. इथूनच 'छाबडिया' गोत्राला सुरुवात झाली. ही दोन्ही मुलं मोठी होऊन गावात स्थायिक झाली. आज त्यांचेच वंशज गावात राहतात. त्यामुळे सर्व एकाच वंशाचे असल्यानं इथं कोणीही रक्षाबंधन साजरं करत नाही. विशेष म्हणजे, सुराना गावातील बहुतेक लोक आपल्या नावापुढे 'छाबडिया' लावतात.
हेही वाचा :