उदयपूर (राजस्थान) : देशभरात आज रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या निमित्ताने उदयपूरच्या इक्बाल सक्का यांनी एक विशिष्ट राखी बनवली. आतापर्यंत १०० हून अधिक विश्वविक्रम करणाऱ्या इक्बाल यांनी आता चक्क जगातली सर्वात लहान राखी बनवली आहे! विशेष म्हणजे, ही राखी शुद्ध सोन्यापासून तयारके आहे.
राखी लांबी केवळ एक मिलिमीटर : राजस्थानच्या उदयपूरमधील कारागीर इक्बाल सक्का यांनी रक्षाबंधनासाठी जगातील सर्वात लहान राखी बनवली. यासाठी त्यांनी जागतिक रेकॉर्ड बुकमध्ये दावाही केला आहे. ही राखी केवळ एक मिलिमीटरची असल्याचं सक्का यांनी सांगितलं. ही राखी बनवायला त्यांना दोन दिवस लागले. ही राखी इतकी पातळ आहे की ती १२ नंबरच्या सुईतूनही आरपार जाऊ शकते. तसेच ही सूक्ष्म राखी लेन्सच्या साहाय्याने पाहिल्यास तिची कलाकृती उत्तम प्रकारे दिसून येते.
अशी राखी का बनवली : इक्बाल सक्का यांनी अशी राखी का बनवली, याचं कारण सांगितलं. मध्य प्रदेशातील इंदूरमधल्या खजराना गणेश मंदिरात ४० x ४० इंच आकाराची जगातील सर्वात मोठी राखी आहे. ही राखी अष्ट धातूची असून ती गणेशाच्या मनगटावर बांधलेली आहे. अशा परिस्थितीत, त्यांची जगातील सर्वात लहान राखी देखील त्याच मंदिरातील गणेशाला बांधावी, अशी इक्बाल सक्का यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्रही लिहिले. पत्राद्वारे त्यांनी ही राखी राज्यातील जनतेच्या वतीने खजराना गणेश मंदिरात गणपतीला बांधण्यात यावी, अशी विनंती केलीय.
इक्बाल यांच्या नावे 100 हून अधिक जागतिक विक्रम : सुवर्ण कारागीर इक्बाल सक्का यांच्या नावावर आतापर्यंत तब्बल १०० हून अधिक विश्वविक्रम आहेत. ते अशा सूक्ष्म कलाकृती तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, ज्या भिंगाच्या साहाय्याने पहाव्या लागतात. अशा आगळ्यावेगळ्या कलाकृती साकारताना त्यांनी एका डोळ्याची दृष्टीही गमावली. इक्बाल हे त्यांच्या सोन्याच्या उत्कृष्ट कलाकृतींसाठी ओळखले जातात. इक्बाल सांगतात की, लहानपणी ते वर्तमानपत्रात सोनारकामाबद्दल वाचायचे. जगातील सर्वोत्कृष्ट सोन्याच्या कारागिरीचे रेकॉर्ड अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन या देशांच्या नावावर होते. या क्षेत्रात भारताचेही नाव असावे, अशी त्यांची इच्छा होती. यापासून प्रेरणा घेत त्यांनी या कामाला सुरुवात केली.
आतापर्यंत बनवलेल्या खास गोष्टी : अलीकडेच इक्बाल यांनी २४ कॅरेट सोन्याची जगातील सर्वात लहान हॅण्डबॅग बनवली होती. या छोट्या पिशवीची लांबी केवळ ०.०२ इंच आहे. ही हँडबॅग साखरेच्या दाण्यापेक्षाही लहान असल्याचे इक्बाल सक्का सांगतात. त्यांनी अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या रामाच्या मंदिरासाठीही तीन सूक्ष्म कलाकृती तयार केल्या आहेत. यामध्ये सोन्याची वीट, घंटा आणि दोन खडावांचा समावेश आहे. यासोबतच इक्बाल यांनी जगातील सर्वात लहान सोन्या-चांदीचे पुस्तकही बनवलंय. हे पुस्तक ६४ पानांचे असून, त्यात अरबीमध्ये अल्लाह, संस्कृतमध्ये ओम, ख्रिश्चन धर्माचा क्रॉस आणि शीख धर्माचा खंडा कोरलेला आहे.
स्वातंत्र्यदिनी ०.५ मिमीचा तिरंगा ध्वज बनवला : इक्बाल सक्का यांनी या स्वातंत्र्यदिनी केवळ ०.५ मिमीचा तिरंगा ध्वज बनवला होता. तसेच त्यांनी सर्वात कमी वजनाची सोन्याची साखळी बनवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. याशिवाय त्यांनी जगातील सर्वात लहान चहाची किटली, सर्वात लहान सोनेरी स्टंप देखील बनवला आहे. त्यांच्या विक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, वर्ल्ड अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.
हेही वाचा :