फतेहबाद (हरयाणा) - पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेत नाही. या वादात आणखी एक ठिणगी पडण्याची शक्यता आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे प्रवक्ते नेते आणि बीकेयुचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत हे येत्या 9 जून रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. शेतकरी आंदोलनाची पुढील रणनिती ठरवण्यासंदर्भात ते ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
राकेश टिकैत यांनी यापूर्वी पश्चिम बंगाल राज्याचा दौरा केला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राज्यात शेतकरी सभा घेतल्या होत्या. तसेच भाजपाविरोधात ममतांचे समर्थन केले होते.
कृषी कायद्याविरोधात विधेयक पारित -
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधआत ममता बॅनर्जी यांनी भूमिका घेतलेली आहे. तसेच उघडपणे त्यांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले आहे. तसेच टीएमसीच्या नेत्यांनी शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या दिल्ली बॉर्डरला भेट दिली होती आणि समर्थन दर्शवले होते. तसेच पश्चिम बंगालमध्येही कृषी कायद्याविरोधात विधेयक पारित करण्यात आले आहे. पश्चिम बंगालचे संसदीय कार्यमंत्री पार्थ चटर्जी यांनी विधानसभेत केंद्राचे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.
शेतकऱ्यांचे आंदोलन
आतापर्यंत देशात झालेल्या आंदोलनापैकी एक प्रभावशाली आंदोलन शांतेतत दिल्लीत सुरू होते. मात्र, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलनाला गालबोट लागले होते. केंद्रीय कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये दिल्लीतील विज्ञान भवनात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. यात दीड वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. तर जोपर्यंत तीन कृषी कायदे रद्द होत नाहीत, एमएसपीची हमी दिली जात नाही, तोपर्यंत शेतकरी आंदोलन मागे हटणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. नोव्हेंबर 2020 राजधानीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांचा निर्धार कमी झालेला नाही. शेतकरी आपल्या मुख्य मागणीवरुन हटलेले नाहीत. कायदा मागे घेतल्याशिवाय माघार नाही ही पहिल्या दिवशीची मागणी आजही कायम आहे.