देहराडून : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७२ दिवसांपासून देशभरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यासाठीच शेतकरी संघटनांनी सहा फेब्रुवारीला दुपारी १२ ते तीन वाजेपर्यंत देशात चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आज केलेल्या घोषणेनुसार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हे आंदोलन होणार नाही.
जिथे असाल तेथूनच आंदोलनात सहभागी व्हा..
उत्तराखंडमध्ये सहा फेब्रुवारीला चक्काजाम होणार नाही, त्याऐवजी शेतकरी आपल्या मागण्यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देतील असे टिकैत यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी देशभरातील लोकांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहनही केले. "शेतकऱ्यांपैकी कोणालाही दिल्लीमध्ये येण्याची गरज नाही, आपण जिथे असाल तिथेच शांततापूर्ण मार्गाने चक्काजाम करा" असेही टिकैत यावेळी म्हणाले.
७२ दिवसांपासून सुरू आहे आंदोलन..
गेल्या ७२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. केंद्राने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, आणि एमएसपी लागू करावी हीच या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारने कायद्यामध्ये बदल करण्याबाबत पर्याय या आंदोलकांना दिला होता. मात्र कायदे पूर्णपणे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : 'अबकी बार-ट्रंप सरकार' हे चाललं, तर रिहानाचा विरोध का, काँग्रेस नेत्याचा सवाल