सोनीपत - दिल्लीच्या सीमेवरील तीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ शेतकरी आंदोलन सुरूच आहे. आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्रावर टीका केली. तसेच केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाला शाहीन बागेचे आंदोलन समजू नये, असे ते म्हणाले. राजस्थानमध्ये भाजपानेच माझ्यावर हल्ला केला होता, असा आरोपही त्यांनी केला. तसेच कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन संपणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना एक निमित्त आहे. शाहीन बागेप्रमाणे आंदोलन हे सरकार उठवू इच्छित आहे. शाहीन बागेप्रमाणे हेही आंदोलन संपेल, हा भ्रम सरकारने आपल्या मनातून काढून टाकावा. कारण हे आंदोलन संपणार नाही, असे राकेश टिकैत म्हणाले. गहू कापणीचा काळ सुरू आहे. काही शेतकरी गावाकडे गेले आहेत. ते गहू कापणीनंतर पुन्हा सीमेवर परततील. संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीनंतर संसद मोर्चा कधी काढायचा हा निर्णय घेण्यात येईल, असे टिकैत म्हणाले.
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे देशभरात आंदोलन सुरू आहे. किसान संयुक्त मोर्चाचे प्रवक्ते आणि भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत सध्या देशभरात ठिकठिकाणी किसान महासभांचे आयोजन करत आहेत. देशभरातील शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये या कायद्यांविरोधात जनजागृती व्हावी यासाठी ते महापंचायती बोलावत आहेत.
शेतकऱ्यांची भूमिका -
कृषी कायदे रद्द नाही. तर दीड वर्षासाठी स्थगीत करू, असा प्रस्ताव केंद्राने शेतकऱ्यांना दिला होता. मात्र, कृषी कायदे रद्द करावे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले होते. ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर काही आंदोलनकर्त्यांनी घराची वाट धरली होती. मात्र, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या भावनात्मक आवाहनानंतर शेतकरी पुन्हा सीमेवर परतले. हे सर्व आंदोलन बांधून ठेवण्यात राकेश टिकैत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही, वेळ आली तर शेतकऱ्यांसाठी आत्महत्या करेल, असा इशाराही राकेश टिकैत यांनी दिला. सरकारने कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. आता केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यातील हा संघर्ष कुठपर्यंत जातो, हे पाहणं आता महत्त्वाच ठरणार आहे.
हेही वाचा - निकालाआधीच तामिळनाडूत काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू; जिंकल्यास पोटनिवडणूक