नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील सिंघू, गाझीपूर आणि टीकरी सीमेवर मागील अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. ऑक्टोबरपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार शेतकरी नेत्यांनी केला आहे. दरम्यान, उन्हाळा ऋतू येत असल्याने आंदोलकांसाठी सीमेवर मोठे जनरेटर लावावे लागतील. मात्र, जर सरकारला हे टाळायचे असेल तर त्यांनी आम्हाला वीज पुरवठा करावा, असे राकेश टीकैत यांनी म्हटले आहे.
सीमेवर सरकारने वीज कनेक्शन द्यावे -
सरकारला वाटत असेल आंदोलक उन्हाळ्यात घरी निघून जातील. मात्र, आम्ही गर्मीतही मागे हटणार नाही, असे टिकैत यांनी म्हटले. कडक उन्हामुळे गाझीपूर सीमेवर आंदोलकांची गर्दी कमी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, शेतकरी आंदोलन स्थळावरील झोपडीतच थांबत असल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. उन्हाळा सुरू होत असल्याने सीमाभागात वीजेचे कनेक्शन द्यावे, अशी मागणी टिकैत यांनी केली आहे.
किसान क्रांती पार्क उभारणार -
दरम्यान, गाझीपूर सीमेवर किसान क्रांती पार्क उभारणार येणार असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी केली आहे. या पार्कमध्ये शेतकरी आंदोलनाचा झेंडा उभारण्यात येईल. येत्या काही दिवसांतच पार्क उभे राहील, अशा विश्वास शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. जो पर्यंत कायदे मागे घेतले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. सरकारसोबत शेतकऱ्यांच्या चर्चेच्या ११ फेऱ्या झाल्या असून अद्याप तोडगा निघाला नाही.