नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. हजारो शेतकरी आंदोलक सिंघु, टिकरी, गाजीपूर आदी बॉर्डवरच थांबले आहेत. शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत गाझीपूर सीमेवर साफ-सफाई करताना आढळले. बैरिकेडच्या आसपास त्यांनी सफाई केली. ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तिथे थोडाही कचरा पडू देणार नाही. सर्व ठिकाणे स्वच्छ ठेवण्यात येतील, असे ते म्हणाले.
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. हे शेतकरी आंदोलन महात्मा गांधी यांची जयंती अर्थात 2 ऑक्टोंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा राकेश टिकैत यांनी केली आहे. 2 ऑक्टोंबरनंतर आम्ही पुढील योजना जाहीर करू. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत मागे हटणार नाही, असे ते म्हणाले. कृषी कायदे रद्द केल्यानंतर आंदोलक शेतकरी आपल्या घरी परततील असं टिकैत यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं.
खिळे ठोकलेल्या जागेवरच लावली फुलं -
आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सर्व सीमा बंद केल्या आहेत. सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर दिल्ली पोलिसांनी सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली असून, काँक्रीटमध्ये रुतलेल्या मोठ्या खिळ्यांचे तीन-चार पदरी अडथळे तयार केले आहेत. यावर उत्तर म्हणून शेतकऱ्यांकडून या खिळे ठोकलेल्या जागेवरच फुलं लावण्यात येत आहेत.
आंदोलनाला प्रसिद्ध व्यक्तींचा पाठिंबा -
प्रजास्ताक दिनी ट्रॅक्टर परेडला गालबोट लागल्यानंतर शेतकरी घराकडे निघाले होते. मात्र, शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज सीमेवर येऊ लागली आहे. तसेच शेतकरी आंदोलनाला अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी पाठिंबा दिला आहे. यात काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींचाही समावेश आहे.