बाराबंकी - सरकारने जर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलण्याचे स्वातंत्र्य दिले. तर लवकर तोडगा निघेल, असे भारतीय किसान युनियनचे (भाकियू) राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत म्हणाले. ते किसान महापंचायतीला संबोधित करत होते. केंद्र सरकारने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पिंजऱ्यातील पोपट करून टाकलं आहे, असेही ते म्हणाले.
सरकारने राजनाथ सिंह यांना बोलण्याचे स्वातंत्र्य दिले. तर तोडगा निघेल. याचा मला पूर्ण विश्वास आहे. तसे केल्यास भाजपची विश्वासार्हताही शिल्लक राहील. शेतकरी राजनाथ सिंह यांचा आदर करतात. पण सरकार त्यांना शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची संधी देत नाही. हे सरकार हट्टी आहे, सरकारने शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि दृष्टीकोन बदलावा, असे टिकैत म्हणाले.
पूर्वी देशात हिंदू आणि मुसलमान प्रेमाने राहत होते. मात्र, 2013 पासून भाजपाने मुस्लिमांबद्दल बरेच गैरसमज पसरवले. परंतु, आता लोकांना भाजपाच्या युक्त्या समजल्या आहेत. म्हणूनच आता त्यांची डाळ' शिजणार नाही, अशी टीका त्यांनी भाजपावर केली.
हे कृषी कायदे रद्द केले नाही. तर ते आगामी काळात आपल्या कसे गुलाम बनवतील, हे शेतकऱ्यांना सांगायचे आहे. यासाठी आम्ही संपूर्ण पूर्वांचलमध्ये शेतकरी पंचायत आयोजित करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात एक महापंचायत असेल, असे ते म्हणाले.
शेतकरी आंदोलन -
कृषी कायद्यांविरोधात सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना ज्या कायद्यांवर आक्षेप असेल. त्या कायद्यातील तरतुदींचा उघडपणे विचार करण्यास सरकार तयार आहे, असे सरकारने म्हटलं आहे. तर तीन कायद्यांमधील बदलांबाबतचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी नाकारला आहे. तिन्ही कायदे रद्द करावे. तरच आंदोलन मागे घेण्यात येईल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.