जयपूर : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांमधील प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपानंतर आता राजकीय नेत्यांकडून धमकीची भाषा वापरली जात आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा भाजपच्या उमेदवाराचा ऑडिओ क्लिप समोर आली आहे. हा ऑडिओ समोर आल्याने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका केली आहे.
निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी धर्माबाबत खुलेआम वक्तव्य करत आहेत. ते निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे. गेहलोत म्हणाले की, मी हे प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने सांगत आहे की, निवडणूक सभांमध्ये धर्मावर असे भाषण देता येणार नाही. जर प्रचारात कोणी धार्मिक प्रचार करत असेल, धर्माचे नाव घेत असेल, तर त्याच्या प्रचारावर तात्काळ बंदी घालावी. देशातील महागाई आणि बेरोजगारी हीच मोठी समस्या असल्याचे जनतेला समजले आहे
पंतप्रधान मोदींनी मौन बाळगणे धोकादायक- गेहलोत म्हणाले की, भाजपचे उमेदवार काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षासह कुटुंबाला संपविण्याविषयी बोलतात. भाजपचे सर्व नेते एवढेच नव्हे पंतप्रधान मोदीही काही बोलत नाहीत. त्यांनी मौन बाळगणे हे धोकादायक आहे. हा देशातील लोकशाहीचा पराभव आहे. निवडणूक आयोगदेखील मौन बाळगून आहे. आम्ही चौकशी करू असेही त्यांनी सांगितले नाही. कर्नाटकात धार्मिक वक्तव्ये करणाऱ्या पीएम मोदींच्या सभांवर बंदी घालण्याची मागणीही गेहलोत यांनी केली आहे. भाजपचे उमेदवार मणिकांत राठोड हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर हल्ला करण्याची धमकी कोणी देऊ शकते.
भाजप आणि आरएसएसचा अजेंडा निश्चित- आता देशवासीयांनी आणि राज्यातील जनतेने भूमिका बजावून धैर्य दाखवण्याची गरज आहे. ते (भाजप) काँग्रेस मुक्त भारताच्या गप्पा मारतात, याचा अर्थ त्यांना एका पक्षाची राजवट हवी आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. गेहलोत म्हणाले की, भाजप आणि आरएसएसचा अजेंडा निश्चित असून देश व राज्यासाठी चिंताजनक आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले, खरगे यांनी ५० वर्षांहून अधिक काळ देशाची सेवा केली आहे. निवडणुकीत यश मिळू लागताच काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी सर्व पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला. भाजपने धमकावण्याचा प्रयत्न सुरू केल्याने लोकशाही संपुष्टात येईल.