नवी दिल्ली- काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करण्यात आला आहे. राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळाल्यानंतर काँग्रेससाठी ही दुसरी दिलासादायक मोठी बातमी आहे.
कोण आहेत रजनी पाटील? काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जवळच्या नेत्या अशी रजनी पाटील यांची ओळख आहे. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९५८ साली वाळवा जि. सांगली तालुक्यातील बहिरवडगाव येथे झाला. पाटील यांचे वडील आत्माराम पाटील स्वातंत्र्यसैनिक होते. माजी मंत्री अशोक पाटील यांच्या पत्नी आहेत. रजनी पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मानस कन्या आहेत.
उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही गौरव - 1996 मध्ये काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यानंतर त्यांनी भाजपकडून लोकसभेची उमेदवारी घेऊन निवडणूक जिंकली. 1998 साली त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2013 मध्ये त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली होती. यापूर्वी रजनी पाटील यांचा उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही गौरव करण्यात आला आहे.
यामुळे झाली होती निलंबनाची कारवाई : संसद कामकाजादरम्यान व्हिडिओ बनवून ट्विटर अपलोड केल्याने राज्यसभा खासदार रजनी पाटील यांचे निलंबन करण्यात आले होते. राज्यसभेचे अध्यक्ष तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ही कारवाई केली होती. संसदेचे चालू अधिवेशन असताना ही कारवाई झाल्याने विरोधकांना संताप व्यक्त केला होता. निलंबनानंतर रजनी पाटील यांनी जाणीवपूर्वक असे केले नसतानाही कठोर शिक्षा देणे योग्य नसल्याचे म्हटले होते. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील असून न्याय मिळाला व्हावा, अशी भूमिका रजनी पाटील यांनी मांडली होती. अपमानास्पद पद्धतीने निलंबित करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले होते. संसदेचे पावित्र्य राखण्यासाठी कारवाई करणे योग्य असल्याचे उपसभापतींनी म्हटले होते. भाजपानेही रजनी पाटील यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले होते.
हेही वाचा-