नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ट्विटरवर पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते, जवळचे मित्र आणि पत्रकारांना अनफॉलो केले आहे. राहुल गांधींनी टि्वटरवर अनेकांना अनफॉलो केल्यानंतर चर्चेला उधान आले. यावर राहुल गांधींचे अकाउंट रिफ्रेश केले जात असल्याचे काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
राहुल गांधी ट्विटरवर जबरदस्त अॅक्टिव्ह आणि आक्रमक असतात. टि्वटच्या माध्यमातून ते मोदी सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढताना पाहायला मिळाले आहेत. राहुल गांधींच्या टि्वटर टीमकडून अनेकांना अनफॉलो करण्यात आले आहे. यात राहुल गांधींच्या जवळचे काही लोक आहेत. यात केबी बायजू, निखिल, निवेदिता अल्वा आणि अलंकार सवाई यांचाही समावेश आहे. राहुल गांधींनी सध्या 219 लोकांना फॉलो केले आहे.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांचे खाते रिफ्रेश केले जात आहे. याअंतर्गत ही एक एक्सरसाइज आहे. लवकरच ते एका नवीन रणनीतीनुसार परत येतील. राहुल गांधींची टीम नवी लिस्ट तयार करत असून या नव्या लिस्टमध्ये जुन्या लोकांचा समावेश केला जाऊ शकतो.
राहुल गांधींनी अनेकांना अनफॉलो केले असले तरी बरेच मोठे नेते त्यांच्या फॉलो यादीमध्ये अद्याप आहेत. खासदार माणिकम टागोर, शक्तीसिंह गोहिल, ओमन चांडी यांच्यासारख्या नेत्यांचा या यादीत समावेश आहे. अभिषेक मनु सिंघवी आणि पवन खेरा हे खास प्रवक्तेही या यादीमध्ये आहेत.