कोईम्बतूर : काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या तमिळनाडू आणि केरळ दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी ते दिल्लीहून विमानाने कोईम्बतूरला पोहचले. या दोन दिवसीय दौऱ्यात ते उटीला देखील भेट देणार आहेत. तेथून ते केरळमधील त्यांच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघात जातील.
खासदारकी परत मिळाल्यानंतर प्रथमच वायनाडला : लोकसभेची खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल गांधी प्रथमच त्यांच्या लोकसभा मतदारसंघात जाणार आहेत. मोदी आडनाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल केले.
१२ आणि १३ ऑगस्ट रोजी वायनाडला असतील : 'राहुल गांधी १२ ऑगस्टला वायनाडला येणार आहेत. आम्ही त्यांच्या स्वागताची व्यवस्था करणार आहोत. त्यासाठीची तयारी आधीच सुरू झाली आहे. या दरम्यान जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होणार आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी राहुल गांधी तेथे उपस्थित राहतील', असे केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व्ही टी सिद्दिकी यांनी सांगितले. वायनाडच्या इतिहासात आत्तापर्यंत कोणाचेच असे स्वागत झाले नसेल, तसे स्वागत आम्ही राहुल गांधींचे करणार आहोत, असे सिद्दिकी यांनी सांगितले.
राहुल गांधींना बंगला पुन्हा मिळाला : पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना दिल्लीतील त्यांच्या १२ तुघलक लेन येथील बंगल्याचा ताबा पुन्हा देण्यात आला आहे. इस्टेट कार्यालयाकडून तशी अधिकृत पुष्टी झाल्याचे सांगण्यात आले आहे. राहुल गांधींना २४ मार्च रोजी लोकसभेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते. त्यांना मोदी आडनावावरील टिप्पणीसाठी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. मानहानीच्या खटल्यातील त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या अंतरिम अर्जावर सुरत सत्र न्यायालयाने २० एप्रिल रोजी आदेश दिल्यानंतर त्यांना बंगला रिकामा करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानंतर राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या १० जनपथ रोडवरील निवासस्थानी राहायला गेले होते.
हेही वाचा :