नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. लसीचा तुडवडा जाणवल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे. यावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आहे. केंद्र सरकारकडे जुमले आहेत. मात्र, लसी नाहीत, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.
देशात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त राहुल गांधींनी शेअर केले आहे. मध्य प्रदेशात गेल्या एका दिवसात फक्त 38 हजार लसी टोचवल्याची माहिती आहे. तर दिल्लीसह इतर राज्यातही कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचे राहुल गांधींनी शेअर केलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठं हत्यार आहे. मात्र गेल्या काही दिवसात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. देशात कोरोनावर नियत्रंण मिळवण्यासाठी लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. सध्या देशात कोविशिल्ड , कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लसीच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे.
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसी 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत वापरल्या जात होत्या. मात्र, अनेक ठिकाणी लस तुटवडा जाणवल्यानंतर भारतात परदेशातील लसींना मान्यता देण्यात येत आहे. सध्या रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला मान्यता देण्यात आली आहे. तर इतरही लसींच्या चाचण्या सुरू आहेत.
कोरोनाची देशातील परिस्थिती -
देशातील कोरोनाबाधित रुग्णांनी 3 कोटीचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत 4 लाख लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 38,792 कोरोना रुग्ण आढळले असून 624 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी 3,09,46,074 वर पोहचली आहे. तर बुधवारी दिवसभरात 37,14,441 जणांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत 38,76,97,935 जणांचे लसीकरण झाल्याचे आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.