नवी दिल्ली - मागील अडीच महिन्यापासून केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. शेतकरी आपल्या मागण्यावरून मागे हटण्यास तयार नाहीत. गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच २ ऑक्टोबरपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अहंकार सोडा आणि शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घ्या, असा सल्ला त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.
शेतकरी मोदी सरकारवर नाराज -
गांधी जयंतीपर्यंत आंदोलन करण्याच्या निर्णयातून शेतकऱ्यांचा दृढ निश्चय दिसून येतो. तसेच ते मोदी सरकारवर किती निराश आहेत, हे सुद्धा स्पष्टपणे दिसून येत आहे. अहंकार सोडा. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे दुख: जाणून घ्या. शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मागे घ्या, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मंजुर केल्यानंतर राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तत्काळ पाठिंबा दिला होता.
चर्चेच्या ११ फेऱ्या निष्फळ -
सुरुवातीला पंजाब आणि हरयाणा राज्यात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. त्यानंतर आता मागील अडीच महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर हजारो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सर्व सामानासहीत शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत राहत आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आत्तापर्यंत चर्चेच्या ११ फेऱ्या झाल्या असून तोडगा निघाला नाही.