मुंबई : कॉम्रेड बलविंदर सिंग हत्या प्रकरणातील दुसऱ्या फरार आरोपीला पकडण्यात पंजाब पोलिसांना यश मिळाले आहे. मुंबई विमानतळावरुन हा आरोपी दुबईला जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. इंद्रजीत सिंग असे या आरोपीचे नाव आहे. इंद्रजीतने आपला साथीदार गुरजीत सिंग यासोबत मिळून बलविंदर सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी हत्या केली होती.
पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरजीत सिंग याला दिल्ली पोलिसांनी ७ डिसेंबर २०२०ला अटक केली होती. त्याच्यासोबत सुखजीत सिंग यालाही अटक करण्यात आली होती. ज्यावेळी गुरजीत आणि इंद्रजीत हत्या करत होते, तेव्हा सुखजीत हा काही अंतरावर थांबला होता अशी माहिती पुढे चौकशीत समोर आली. तर, हत्येनंतर इंद्रजीत फरार झाला होता.
विदेशी खलिस्तानी कार्यकर्त्यांनी पुरवली मदत..
अटक करण्यात आल्यानंतर इंद्रजीतने पोलिसांना सांगितले, की दोन खलिस्तानी कार्यकर्त्यांनी मार्च २०२०मध्ये फेसबुकवरुन त्यांना संपर्क साधला होता. तसेच, त्यांनीच आपल्याला बलविंदर यांची हत्या करण्यास प्रोत्साहित केल्याचेही इंद्रजीतने सांगितले. सनी (रा. कॅनडा) या खलिस्तानी कार्यकर्त्यानेच आपल्याला सुख भिखारीवाल या दरोडेखोराशी संपर्क करुन दिल्याचेही इंद्रजीतने सांगितले. यासोबतच या सनी नावाच्या व्यक्तीने हत्येपूर्वी आणि हत्येनंतरही इंद्रजीत आणि त्याच्या साथीदारांना आर्थिक मदत केल्याचेही सांगितले.
गुप्त माहितीवरुन केली कारवाई..
गुप्ता यांनी सांगितले, की हत्येनंतर दिल्ली पोलिसांनी गुरजीत आणि सुखजीत यांना ताब्यात घेतले होते. मात्र, इंद्रजीत फरार झाला होता. इंद्रजीत त्यानंतर बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी लपून बसला होता. यानंतर तरणतारण पोलिसांच्या एका पथकाला अशी माहिती मिळाली, की इंद्रजीत विमानाने दुबईला पळण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार कारवाई करत, पोलिसांनी इंद्रजीतला अटक केली.
काय आहे प्रकरण..?
शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित बलविंदर सिंह यांची पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. घराशेजारील कार्यालयात असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बलविंदर सिंह (६२) हे पंजाबातील खलिस्तानी चळवळ आणि दहशतवाद्यांशी मागील अनेक वर्षांपासून लढत होते. अनेक वेळा त्यांच्यावर आणि कुटुंबीयांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. मात्र, ते या हल्ल्यातून बचावले होते. मात्र, मागील वर्षी तरणतारण पोलिसांच्या शिफारसीनंतर सिंह यांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली होती.
हेही वाचा : पश्चिम बंगालच्या विधानसभेत कृषी कायद्याविरोधात विधेयके संमत