चंदीगड ( पंजाब ) : पंजाब सरकारने राजकारणी, धार्मिक नेते, माजी राज्यसभा सदस्य, माजी आमदार, माजी सभापती, निवृत्त पोलीस कर्मचारी आणि इतरांसह ४२४ लोकांना दिलेली सुरक्षा काढून घेतली ( VIP security withdrawn in Punjab ) आहे. ज्या प्रमुख व्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे त्यात सुखदेव सिंग धिंडसा, इंदरबीर सिंग बुलारिया, शरणजीत सिंग ढिल्लोन, अनिल सरीन, माजी सभापती राणा केपी, लखबीर सिंग लाखा, इंदू बाला, दर्शन सिंग ब्रार, सिद्धू मुसेवाला, गणेश कौर मजिठिया, कुलजीत नागरा, मदनलाल जलालपूर, सुरजित धीमान, हरदयाल सिंग कंबोज, रुपिंदर रुबी, फतेह जंग बाजवा, सुखपाल भुल्लर, दिनेशसिंग बब्बू, संजय तलवार, जगदेवसिंग कमलू, हरमिंदर सिंग गिल, बडविंदर लाडी, जगतार सिंग जग्गा, दविंदर सिंग घुबया, निर्मल सिंग, निर्मल सिंग, अमर सिंग ढिल्लन, जोगिंदरपाल भोआ, धर्मबीर अग्निहोत्री, तिक्षन सूद आणि इंदरबीर सिंग बुलारिया आदींचा समावेश आहे.
धर्मगुरूंचाही समावेश : या यादीत धर्मगुरूंच्या नावांचाही समावेश आहे. ज्यात जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग आणि डेरा राधा स्वामी सत्संग ब्यास आणि इतर अनेक धार्मिक नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा आणि एमएफ फारुकी यांची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. पंजाब सरकारने माजी मंत्री, आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कुटुंबांचे सुरक्षाकवचही काढले : 184 जणांपैकी माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या कुटुंबाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. याशिवाय पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या मुलाची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल यांचा मुलगा अर्जुन बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणिंदर सिंग यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.