मुंबई - केंद्र सरकारने मंगळवारी मोठा फेरबदल करत ८ राज्यांमध्ये नविन राज्यपालांची नेमणूक केली आहे. यात गोवा राज्याच्या राज्यपालपदी पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची नेमणूक करण्यात आली आहे. श्रीधरन पिल्लई हे मिझोरामचे राज्यपाल होते. आता ते गोव्याचे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत. पिल्लई यांच्या जागेवर हरि बाबू कंभमपती याची नियुक्ती मिझोरामच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे.
कोण आहे पी. एस. श्रीधरन पिल्लई -
पी. एस श्रीधनरन पिल्लई यांचा जन्म केरळ जिल्ह्यातील अलाप्पुझा जिह्यात झाला. त्यांच्या आईचे नाव भवानी अम्मा तर वडिलांचे नाव सुकुमारन नायर. त्यांनी 1984 मध्ये काझिकोड कालीकट न्यायालयात वकिली केली आहे. यादरम्यान, त्यांनी अॅड रिठा यांच्याशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव अर्जुन श्रीधर असे आहे. अर्जुन श्रीधर हे केरळ उच्च न्यायालयात वकिली करतात.
पी. एस श्रीधरन पिल्लई यांनी भूषवलेली पदे -
- राज्य संयोजक, लोक तांत्रिक युवा मोर्चा
- लोक संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी संघटनेचे नेते (आणीबाणी विरोधी आंदोलन)
- जिल्हाध्यक्ष, प्रदेश सचिव - युवा मोर्चा ( 1980)
- अध्यक्ष, बार असोसिएशन, कोझिकोड (1995 )
- भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य
- लक्षद्वीपसाठी भाजप प्रभारी
- जिल्हाध्यक्ष (केरळ राज्य भाजप)
- राज्य सचिव (केरळ राज्य भाजप)
- राज्य सरचिटणीस (केरळ राज्य भाजप)
- उपाध्यक्ष आणि प्रवक्ता (केरळ राज्य भाजप)
- अध्यक्ष (केरळ राज्य भाजप 2003-06 आणि 2018-19)
श्रीधरन पिल्लई यांनी राजकीय सुरूवात एबीव्हीपीच्या माध्यमातून झाली. ते १९७८ मध्ये एबीव्हीपीचे राज्य सचिव होते. त्याआधी त्यांनी कॉलेजच्या दिवसात एबीव्हीपीचे काम देखील केलं आहे. त्यानंतर त्यांनी काझिकोड जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष म्हणून काम केलं. सी. के पद्मनबन यांच्यानंतर ते केरळ राज्याचे भाजप अध्यक्ष झाले. 2003 ते 2006 पर्यंत त्यांनी हे काम पाहिले. यानंतर त्यांनी अनेक पदे भूषवली. 25 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांची नियुक्ती मिझोरामच्या राज्यपालपदी करण्यात आली. त्यांनी मिझारोमचे 15वे राज्यपाल म्हणून काम पाहिलं. आता त्यांची नियुक्ती गोवा राज्याच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे.
श्रीधरन पिल्लई यांची गोवा राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी आमच्या सुंदर राज्यात श्रीधरन पिल्लई यांचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, मागील काही महिन्यापासून गोवा राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गोवा राज्याचे प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहत होते.