लखनौ - उत्तर प्रदेशात (UP) गेल्या 5 वर्षात 16.5 लाख तरुणांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. ४ कोटी लोकांनी हताश होऊन नोकऱ्यांची आशा सोडली. पण राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यावर ना बोलले ना ट्विट केले. कारण पडदा उचलला तर गुपित उघडं होईल हे त्यांना माहीत आहे, अशी टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी योगींवर केली आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विट करत योगींवर निशाणा साधला.
- प्रियंका गांधींची योगींवर टीका -
सध्या उत्तर प्रदेश निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष ताकदीने प्रचाराला लागले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर त्या टीका करत आहेत. युवा वर्गाच्या नोकऱ्यांवरून त्यांनी भाजपला टार्गेट केले आहे.
- उत्तर प्रदेश निवडणूक कार्यक्रम -
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याचे आयोगाने जाहीर केले. १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल व मतमोजणी १० मार्चला होणार आहे. पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय दृष्ट्यादेखील हे सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. ४०३ जागांसाठी एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. यात १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी सातही टप्प्यांसाठीचा निकाल जाहीर होणार आहे.