नवी दिल्ली Priyanka Gandhi name in ED charge Sheet : एकीकडं काँग्रेस आपला 139वा स्थापना दिवस साजरा करत आहे. तोच दुसरीकडं काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांचं नाव 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट' (पीएमएलए) संबंधित खटल्याच्या आरोपपत्रात नोंदवण्यात आलंय. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची मुलगी प्रियंका गांधी वाड्रा यांनी दिल्लीस्थित रिअल इस्टेट एजंटच्या माध्यमातून हरियाणात जमीन खरेदी केल्याचं अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) म्हटलंय. या एजंटनं एनआरआय व्यावसायिक सीसी थंपी यांनाही जमीन विकलीय.
ईडीचं म्हणणं काय : ईडीचं म्हणणं आहे की, वाड्रा आणि थंपी यांचे घनिष्ठ संबंध आहेत. दोघंही अनेक व्यवसाय एकत्र करतात. थंपी फरारी शस्त्र विक्रेता संजय भंडारीशी संबंधित आहे. भंडारी यांची मनी लाँड्रिंग, परकीय चलन आणि काळ्या पैशाचे कायदे आणि अधिकृत गुप्तता कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक एजन्सीकडून चौकशी केली जात आहे. तपास यंत्रणांच्या भीतीनं तो भारत सोडून 2016 मध्येच ब्रिटनला पळून गेला होता.
प्रियांकाचं नाव प्रथमच आरोपपत्रात : थंपी आणि ब्रिटिश नागरिक सुमित चड्ढा यांच्यावर भंडारीला गुन्ह्यातील रक्कम लपवण्यात मदत केल्याचा आरोप आहे. मात्र ईडीनं या प्रकरणाशी संबंधित आधीच्या आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रा हे थंपीच्या जवळचे सहकारी म्हणून नाव दिलंय. मात्र न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अधिकृत आरोपपत्रात प्रियंका गांधी यांच्या नावाचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एचएल पाहवा यांनी वाड्रा आणि थंपी या दोघांना जमिनी विकल्याचा आरोप तपास यंत्रणेनं आरोपपत्रात केलाय. हरियाणात जमीन खरेदी करण्यासाठी त्यांना बेनामी पैसे देण्यात आले होते आणि वड्रा यांनी जमीन विक्रीसाठी पूर्ण रक्कम दिली नाही. पाहवा यांनी 2006 मध्ये प्रियांका गांधी यांना शेतजमीन विकली आणि त्यानंतर 2010 मध्ये ती त्यांच्याकडून परत विकत घेतली. विशेष म्हणजे रॉबर्ट आणि प्रियांकाचं नाव आरोपी म्हणून दिलेलं नाही. पण थंपी आणि वाड्रा यांच्यातील संबंध दाखवण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीचा उल्लेख आहे.
हेही वाचा :