सुरत - रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी रक्कम नसल्याने मृतदेह कुटुंबीयाच्या ताब्यात देण्यात येत नसल्याची घटना सुरतमधील अनोखे रुग्णालयात घडली आहे. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रुग्णालय प्रशासानाने मृतदेह कुटुंबाला सोपवला आहे. रविवारी सांयकाळी कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तब्बल 9 तास मृतदेह रुग्णालयात होता. मृतदेह ताब्यात देण्यासाठी रुग्णालय प्रशासानाने कोरोनाबाधिताच्या कुटुंबीयाकडे 3 लाख 70 रुपयांची मागणी केली होती.
महाराष्ट्राच्या नंदुरबार शहरातील भगवान साबेल नामक व्यक्तीला कोरोनावरील उपचारासाठी सुरतमधील अनोखे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पती-पत्नी आणि मुलगा उपचारासाठी सुरतला आले होते. भगवान साबेल यांच्यावर अनोखे रुग्णालयात तर मुलावर सुरतच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच भगवान साबेल यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे कुटुंबाला कळवण्यात आले.
पोलिसांचा हस्तक्षेप -
3 लाख 70 रक्कम भरून मृतदेह नेण्यात यावा, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. मात्र, पैसे देण्यास असमर्थ असल्याचे सांगून मृतदेह ताब्यात देण्याची विनंती भगवान साबेल यांच्या पत्नीने केली. मात्र, रुग्णालयाने मृतदेह देण्यास नकार दिला. अखेर त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मृतदेह देण्यासाठी रुग्णालयाने सहमती दर्शवली.
हेही वाचा - टीएमसी सुप्रिमो ममता बॅनर्जींवर निवडणूक आयोगाची कारवाई, प्रचार करण्यास 24 तासांची बंदी!