नवी दिल्ली - इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या बेकायदेशीर कारवाया आणि वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच क्वाड नेटवर्क सतर्क आहे. उद्या क्वाड देशांची बैठक होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष जो बायडेन सहभागी होणार आहेत. ही बैठक ऑनलाईन असणार आहे. एखाद्या बैठकीत एकत्र सहभागी होण्याची मोदी आणि बायडेन यांचीही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी मोदी आणि बायडेन यांच्या दोनदा दूरध्वनी संभाषण झाले आहे.
लष्करी आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर आशिया पॅसिफिक क्षेत्रात महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न चीनकडून सध्या सुरू आहे. चीनच्या कोणत्याही आगळीकीला प्रत्युत्तर देण्यासाठी चार देशांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे. क्वाड नेटवर्कने चीनविरोधात जास्त कडक धोरण स्वीकारले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी, जो बायडेन यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा बैठकीत उपस्थित असणार आहेत.
काय आहे क्वाड नेटवर्क?
'दि क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग' (क्वॉड) ची सुरुवात वर्ष 2007 मध्ये करण्यात आली होती.चिनी प्रभावाला रोखण्यासाठी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे चार देश एकत्र आले आहेत. संपूर्ण दक्षिण चीन समुद्र चीनच्या मालकीचा असल्याचा दावा चीनने केला आहे. त्यामुळे भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तीन देश क्वाड नेटवर्कमधील महत्वाचे देश आहेत. जर चीनसोबत युद्धाची वेळ आली चीनला घेरण्यासाठी क्वाड नेटवर्क मिळून काम करण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मार्च महिन्यातही कोरोना संसर्गाच्या मुद्यावर क्वॉड देशांची बैठक पार पडली होती.