नवी दिल्ली : ऍथलेटिक्समध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर तसेच देशवासियांकडून नीरजचे अभिनंदन केले जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी ट्विटरवरून नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे.
![राष्ट्रपतींकडून नीरज चोप्राचे अभिनंदन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/president_0708newsroom_1628338636_193.jpg)
राष्ट्रपतींचे ट्विट
नीरज चोप्राचा अभूतपूर्व विजय! तुझ्या भालाफेकीतील सुवर्णपदकाने इतिहास घडविला आहे. पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होताना तु देशाला ऐतिहासिक यश संपादन करत सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तुझे यश देशातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे. मनापासून अभिनंदन! असे ट्विट राष्ट्रपतींनी केले आहे.
![पंतप्रधानांचे ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12704057_modi.jpg)
पंतप्रधानांचे ट्विट
टोकियोत इतिहास लिहिला गेला आहे. नीरज चोप्राने आज मिळविलेले यश कायमस्वरुपी लक्षात ठेवले जाईल. नीरजने खरोखरच उत्तम खेळ सादर केला. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरजचे अभिनंदन! असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
ओम बिर्लांकडून अभिनंदन
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नीरजचे अभिनंदन करताना त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. नीरजच्या यशामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. यामुळे देशातील युवकांना नवी प्रेरणा मिळाली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
मुलाचा अभिमान वाटतो
नीरजच्या वडिलांनी त्याच्या यशावर आनंद व्यक्त केला आहे. माझ्या मुलाने देशाचे स्वप्न पूर्ण केल्याचा मला आनंद आहे. त्याची तयारी पाहूनच तो नक्की पदक जिंकणार यााच विश्वास होता असे त्यांनी म्हटले आहे.
छोरे ने लठ गाड दिया - मनोहरलाल खट्टर
"टोक्यो में हरियाणा के छोरे ने लठ गाड़ दिया और भाले वाला लठ गाड़ दिया. अपेक्षा के अनुरूप हमें गोल्ड मिला." अशी प्रतिक्रिया व्यक्त करत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी देत नीरजचे अभिनंदन केले आहे.
देशाला अभिमान आहे - प्रियंका गांधी-वाड्रा
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनीही नीरजचे अभिनंदन केले आहे. नीरजने अभूतपूर्व यश मिळवून इतिहास घडविला आहे. नीरजवर देशाला अभिमान आहे. अभिनंदन! अशा शब्दांत प्रियंका गांधींनी नीरजचे अभिनंदन केले आहे.
इच्छा तेथे मार्ग हे नीरजने दाखवून दिले - बिपीन रावत
भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनीही नीरजचे अभिनंदन केले आहे. नीरजने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडविला तसेच सैन्य दल आणि देशाची मान गर्वाने उंच केली आहे. इच्छा असेल तर मार्ग नक्की मिळतो हेच नीरजने दाखवून दिले आहे असे रावत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics : व्वा रे पठ्ठ्या! बजरंग पुनियाने प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवत जिंकलं कास्य पदक