नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. मात्र, यावेळी अचानक आंदोलनाला हिंसक वळण लागले. या घटनेवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी घटनेचा निषेध केला आहे. तर काही जणांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडली आहे.
सांबित पात्रा यांची प्रतिक्रिया -
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता सांबित पात्रा यांनी हिंसक आंदोलनाची निंदा केली. ज्यांना आतापर्यंत आपण अन्नदाता असे संबोधत होते. ते फुटीरतावादी निघाले, असे सांबित पात्रा म्हणाले.
सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी -
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये जे झाले. त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. मात्र, हे करण्याची परिस्थिती ज्या कारणांमुळे निर्माण झाली. त्याकडेही दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संयम संपला, असे माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
चिराग पासवान यांची प्रतिक्रिया -
प्रजासत्ताक दिनी फुटीरतावादी लोकांनी आंदोलनाच्या आड हिंसा केली. तीचा कोणत्याच किंमतीवर स्वीकार केला जाऊ शकत नाही. लोक जनशक्ति पार्टी याचा निषेध दर्शवते, असे चिराग पासवान म्हणाले.
आम आदमी पक्षाची भूमिका -
आम आदमी पार्टीने हिंसक आंदोलनाचा निषेध केला आहे. तसेच यासाठी केंद्र सरकाराला जबाबदार धरलं आहे.
काँग्रेसची प्रतिक्रिया -
हिंसा ही कोणत्याच समस्येचे समाधान नाही. सरकारने देशहितासाठी तीन्ही कायदे रद्द करावीत. मार कुणालाही लागला तर त्यामुळे नुकसान आपल्याच देशाचे आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. तर काँग्रेसेच मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनीही हिंसक आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजहट्ट सोडून राजधर्माच्या मार्गावर चालावं. हाच 70 व्या प्रजासत्ताक दिनाचा संदेश आहे. शेतकरी कायदे रद्द करावे, हीच शेतकऱ्यांची मागणी आहे, असे रणदीप सुरजेवाला म्हणाले.
सीताराम येचुरी यांचा केंद्रावर आरोप -
संपूर्ण घटनाक्रमाला केंद्र सरकार जबाबदार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे शांततेत आंदोलन सुरू होते. यात 100 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटलं.