बदायूं (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशच्या बदायूं जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एका व्यक्तीने उंदराला निर्घृणपणे मारले होते. या उंदराच्या हत्येच्या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला होता. प्राणीप्रेमीने या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलीस या अनोख्या प्रकरणाचा तपास करत होते. तपासाच्या आधारे पोलिसांनी ३० पानी आरोपपत्र न्यायालयातही दाखल केले आहे. यामध्ये आरोपीला अनेक मुद्द्यांवर दोषी ठरवण्यात आले आहे.
शेपटीला दगड बांधून बुडवले नाल्यात : शहरातील कल्याण नगर येथील रहिवासी असलेले प्राणी प्रेमी विकेंद्र कुमार यांनी सांगितले की, मागीलवर्षी 24 नोव्हेंबर रोजी ते पानवडिया लोकलमधून जात होते. यावेळी मनोज कुमार हा उंदराच्या शेपटीला दगड बांधून नाल्यात बुडवत होता. त्याची अडवणूक करूनही त्याने हा प्रकार बंद केला नाही. त्यानंतर आरोपीच्या विरोधात उलट लढण्याचा निर्धार प्राणिप्रेमीने केला. नंतर उंदराला नाल्यातून बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची प्राणिप्रेमीने पोलिसात तक्रार केली. बरीच धावपळ केल्यानंतर कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
आरोपपत्र दाखल: बरेली IVRI येथे उंदराचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित लोकांचे जबाबही नोंदवले होते. तपास प्रक्रियेत उंदराच्या शवविच्छेदन अहवालाचाही समावेश करण्यात आला होता. तपासाअंती पोलिसांनी या प्रकरणी ३० पानी आरोपपत्र तयार केले आहे. स्थानिक प्राणी हक्क कार्यकर्ते विकेंद्र शर्मा म्हणाले की, उंदीर हा अनेक लोकांसाठी फक्त एक प्राणी असू शकतो, परंतु ज्या पद्धतीने त्याला मारण्यात आले ते क्रूरतेच्या श्रेणीत येते, म्हणून मी हे प्रकरण हाती घेतले. भविष्यातही ते प्राण्यांच्या हितासाठी आवाज उठवत राहतील. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम रिपोर्ट, व्हिडिओ, पुरावे आणि स्थानिक लोकांच्या वक्तव्याच्या आधारे तपासी अधिकाऱ्यांनी आरोपी मनोज कुमारविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
पाच वर्षांपर्यंत होऊ शकते शिक्षा : या प्रकरणात ५ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असल्याचे ज्येष्ठ वकील स्वतंत्र प्रकाश गुप्ता यांचे म्हणणे आहे. पुराव्यावरच निकाल अवलंबून असेल. माझ्या दृष्टिकोनातून, कलम ४२९ मध्ये नमूद केलेल्या प्राण्यांमध्ये हत्ती, घोडा, गाय, बैल किंवा ज्यांची किंमत ५० रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत ज्या प्राण्यासोबत क्रौर्य करण्यात आले त्याची किंमत काय आहे, हेही फिर्यादीला दाखवावे लागेल. क्रूरता कायदा पाळीव प्राण्यांनाही लागू होतो. अशा परिस्थितीत उंदीर पाळीव प्राण्यांच्या श्रेणीत येतो की नाही हेही पाहावे लागेल.