इंफाळ : मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात कोणतीही हिंसाचाराची घटना झालेली नाही. मात्र परिस्थिती तणावपूर्ण असल्याची माहिती मणिपूर पोलिसांनी दिली आहे. सोमवारपासून राष्ट्रीय महामार्ग 37 (ए) वर मालवाहू वाहनांची वाहतूक सुरू झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश जिल्ह्यांमध्ये जनजीवन पूर्वपदावर आले आहे. राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल राज्यात सतत गस्त, फ्लॅग मार्च आणि शोध मोहीम राबवत आहेत. विशेषत: डोंगरी आणि खोऱ्यातील दोन्ही जिल्ह्यांतील दुर्गम भागात शोधमोहीम सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
सीमावर्ती भागात राबवली शोधमोहीम : गेल्या 24 तासात पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी इंफाळ पश्चिम, काकचिंग, कांगपोकपी आणि चुराचंदपूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात शोधमोहीम राबवली आहे. मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे 110 ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी सुरक्षा दलांचे जवान डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्य़ांमध्ये संचारबंदीच्या काळात निर्माण झालेल्या अप्रिय परिस्थितीमुळे पोलिसांनी विशेषतः डोंगरी आणि खोऱ्यातील 185 जणांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग 37 वरून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरक्षितपणे सुरू आहे. मंगळवारी जिरीबाम येथून एकूण 300 आणि नोनी येथून 356 वाहने माल घेऊन राजधानी इंफाळकडे रवाना झाली.
नागरिकांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्ष : लष्कराने सामान्य जनतेला राज्यातील सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय अफवांकडे दुर्लक्ष करण्याबरोबरच शस्त्रे आणि स्फोटके पोलिसांकडे जमा करण्याचे आवाहनही लष्कराकडून करण्यात आले आहे. आपल्याकडे कोणतेही आक्षेपार्ह पदार्थ असतील तर ते तात्काळ सुरक्षा दलांच्या ताब्यात द्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याशिवाय कोणत्याही बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. नागरिक त्यांना हवी असलेली माहिती 9233522822 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून मिळवू शकतात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हेही वाचा -