नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता राष्ट्राला संबोधित करणार असून त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस संकटात पंतप्रधान मोदींनी याआधीही अनेकदा देशाला संबोधित केलं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी देशाला काय संदेश देणार, हा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला मंत्रही दिला आहे की, 'जबतक दवाई नही, तबतक ढिलाई नही, ' म्हणजेच, जोपर्यंत औषध नाही तोपर्यंत निष्काळजीपणा नाही. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी सहा फुटाचे अंतर गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे.
पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत अनेकदा देशाला संबोधित केलं आहे. गेल्या 30 मेला मोदींना 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी कोरोनाची दुसरी लाट, चक्रीवादळ संकट, ऑक्सिजन, शेतकरी आदींवर भाष्य केले होते. आज पंतप्रधान लसीकरणावर भाष्य करण्याची शक्यता आहे. लस टोचवून घेण्याचे आवाहन ते देशवासियांना करण्याची अंदाज आहे. पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.