नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी 7 गट आणि तीन प्रमुख बहुपक्षीय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी शुक्रवारी रवाना होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी ही घोषणा केली. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मे ते 21 मे या कालावधीत जपान शहर हिरोशिमाला भेट देणार असून जी 7 च्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 सत्रांमध्ये सहभागी देशांसोबत शांतता, समृद्धी, ऊर्जा आणि सुरक्षा या विषयांवर आपले विचार व्यक्त करतील.
जपान ते पोर्ट मोरेस्बी असा राहील प्रवास : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान ते पोर्ट मोरेस्बी असा प्रवास करणार आहेत. तिथे ते 22 मे रोजी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांच्यासोबत फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (FIPIC) च्या तिसऱ्या शिखर परिषदेला संयुक्तपणे संबोधित करतील. यजमान पापुआ न्यू गिनीला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असेल. 2014 मध्ये लाँच केलेल्या FIPIC मध्ये भारत आणि 14 पॅसिफिक बेट देशांचा समावेश आहे. यात फिजी, पापुआ न्यू गिनी, टोंगा, तुवालू, किरिबाती, सामोआ, वानुआतु, नियू, मायक्रोनेशियाची फेडरेशन स्टेट्स, मार्शल आयलंड्स, कूक बेटे, पलाऊ, नौरू आणि सोलोमन बेटांचा समावेश आहे. आपल्या दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ते 24 मे दरम्यान सिडनीमध्ये क्वाड समिटमध्ये सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदींची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी होणार भेट : ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे क्वाड समिट आयोजित करत आहेत. या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि जपानचे पंतप्रधान किशिदा फ्युमिओ हेही सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने किशिदा यांच्या निमंत्रणावरून ते या देशाला भेट देत आहेत. जी 7 गटाचे वर्तमान अध्यक्ष म्हणून जपान आपल्या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. या समिट दरम्यान पंतप्रधान शांतता, समृद्धी यासारख्या विषयांवर आपले विचार व्यक्त करतील. याशिवाय ते अन्न, खते आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता, हवामान बदल आणि पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि विकास सहकार्य यावर चर्चा करणार आहेत.
शिखर परिषदेत होणार द्विपक्षीय बैठक : परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पंतप्रधान किशिदा फ्युमिओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत. शिखर परिषदेच्या बाजूला ते इतर काही सहभागी नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. पापुआ न्यू गिनीमध्येही, मोदी गव्हर्नर-जनरल सर बॉब डेड आणि पंतप्रधान जेम्स मारापे यांच्या भेटीसह द्विपक्षीय व्यवहार करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने क्वाड शिखर परिषदेमुळे नेत्यांना इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील घडामोडींवर विचारांची देवाणघेवाणींसह मुक्त आणि सर्वसमावेशक विकास करण्याची संधी मिळेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २४ मे रोजी अल्बानीज यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 मे रोजी सिडनी येथे एका कार्यक्रमात ऑस्ट्रेलियन कंपन्यांच्या सीईओ आणि व्यावसायिक नेत्यांशी संवाद साधून भारतीय समुदायाला संबोधित देखील करणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा -
- Karnataka CM : दिल्लीत घडामोडींना वेग, सिद्धरामय्या-शिवकुमार खरगेंना भेटले
- AI Powered Sanchar Saathi Launches : चोराने आयएमईआय बदलला तरी हरवलेला मोबाईल सापडणार, केंद्राकडून 'ही' खास सुविधा सुरू
- Tamil Nadu Hooch Tragedy : विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा झाला 21, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस