नवी दिल्ली - प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घ्यावे आणि पाच वर्षांत ते आदर्श गाव करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना केले होते. त्यानुसार त्यांनीही स्वतः वाराणसीतील जयापूर हे गाव दत्तक घेतले होते. आता ते पुन्हा बरियारपुर आणि परमपुर ही दोन गावे दत्तक घेणार आहेत. खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत ते ही गावे दत्तक घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत चार गावे दत्तक घेतली होती. बरियारपुर आणि परमपुर हे त्यांनी दत्तक घेतलेले पाचवे आणि सहावे गाव ठरणार आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे गेल्या वर्षी आदर्श गावे निवडली गेली नव्हती. त्यामुळे ते आता 2 गावे दत्तक घेणार आहेत. पीएमओ कार्यालयाकडून या संदर्भात कोणतेही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. जिल्हा अधिकाऱ्यांना लवकरच अधिकृत परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे.
मोदींनी दत्तक घेतलेली गावे -
पीएमओकडून आदर्श गाव निवडीसंदर्भात अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. परंतु सूचना मिळताच आमची तयारी सुरू होईल. त्यानंतर, विकासात्मक कामे केली जातील, असे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितले. यापूर्वी मोदींनी जयापूर, नागेपूर, ककरहिया आणि डोमरी ही चार गावे दत्तक घेतली होती.
सांसद आदर्श ग्राम योजना काय आहे?
"सांसद आदर्श ग्राम' योजनेतून ग्रामीण भागातील गावे खासदारांनी दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली होती. जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त 11 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सांसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली. सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदार स्वत:चे गाव तसेच सासरवाडीचे गाव सोडून देशातील कोणत्याही गावाची निवड करू शकतात. निवडलेल्या गावांमध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, उपजीविका इ. क्षेत्रांचा विकास प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.