लखनौ - अलीगड जिल्ह्यात राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की 55 ते 60 वर्षापूर्वी अलीगडवरून एक कुलूप विक्रेता माझ्या गावी येत होता. तो मुस्लिम परिवारामधील होता. कुलूप विकून आलेले पैसे विक्रेता माझ्या वडिलांजवळ ठेवत होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की आज बालपणीची एक आठवण सांगावीशी वाटते. ही 55 ते 60 वर्षापूर्वीची जुनी गोष्ट आहे. तेव्हा मी लहान होतो. पूर्वी उत्तर प्रदेशमधील सीतापूर आणि अलीगड हे खूप प्रसिद्ध होते. अलीगडवरून एक कुलूप विक्रेता दर तीन महिन्यांनी गावात येत होता. काळे कपडे घालून विक्रेता येत असल्याचे आजही आठवते. तो विक्रेता गावात आणि इतर व्यापाऱ्यांना कुलूप विकायचा. विक्रेता गावात मुक्काम करत होता. विक्रेत्याबरोबर माझ्या वडिलांची चांगली मैत्री होती. विक्रेता कुलूप विकून आलेले पैसे वडिलांजवळ ठेवायचा. गावातून जाताना विक्रेता वडिलाकडून सर्व पैसे घेऊन जायचा. गावात डोळ्यांना कोणाला त्रास असेल तर ते सीतापूरला जायचे.
संबंधित बातमी वाचा-पंतप्रधानांच्या हस्ते अलीगडमध्ये राजा महेंद्र प्रताप सिंग विद्यापीठाची पायाभरणी; संरक्षण क्षेत्राचेही मिळणार शिक्षण
महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नावाने विद्यापीठाची पायाभरणी करणे ही भाग्याची गोष्ट
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, की आज देश हा स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करीत आहे. स्वातंत्र्याची अमृत महोत्सव साजरे केले जात असताना विकासाकरिता आणखी प्रयत्न आणि गती दिली जात आहे. भारताच्या स्वातंत्र्यात राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या योगदानाला वंदन करण्याची ही पवित्र संधी आहे. राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्यासारखी दुरदृष्टी आणि महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नावाने विद्यापीठाची पायाभरणी करणे ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे.
हेही वाचा-दहशतवाद्यांचा ग्रेनेडने पुलावामात सुरक्षा दलावर हल्ला; चार नागरिक जखमी
हेही वाचा- योगी सरकारच्या जाहिरातीसह धार्मिक टिप्पणीवर काँग्रेसने साधला निशाणा